ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आसरपेंड येथे पॉक्सो कायद्याविषयी कायदे जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न; विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क व स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन

On: February 28, 2026 6:35 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पुसद (प्रतिनिधी) :

दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी तालुका विधी सेवा समिती, पुसद व वकील संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने “कॉमन मिनिमम प्रोग्राम” अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, आसरपेंड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे सकाळी ९.३० वाजता हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थिनींमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे व बालसुरक्षेबाबत संवेदनशीलता वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तदर्थ अतिरिक्त व जिल्हा न्यायाधीश पुसद श्रीमती सोनल एन. शाह मॅडम उपस्थित होत्या. यावेळी पुसद वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड. अमोल एन. भालेराव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता घरजारे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला न्यायालयीन अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिक्षकवृंद व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

🎯 पॉक्सो कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन

या शिबिरात ॲड. जयश्री एस. देशमुख (सदस्य, वकील संघ पुसद) यांनी Protection of Children from Sexual Offences Act, 2012 (POCSO Act) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पॉक्सो कायद्याचे उद्दिष्ट, बालकांचे कायदेशीर हक्क, लैंगिक अत्याचाराची व्याख्या, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, पीडितांच्या संरक्षणासाठी असलेल्या तरतुदी तसेच दोषींना होणाऱ्या शिक्षांबाबत विद्यार्थिनींना सोप्या व

🎯 समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली.

बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जागरूकता, धैर्य आणि वेळेवर तक्रार नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास भीती न बाळगता विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

🎯 विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचा संदेश

अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश श्रीमती सोनल एन. शाह यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास, धैर्य आणि स्वाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हेच खरे सशक्तीकरण असल्याचे सांगत त्यांनी कायद्याची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये, असे आवाहन केले.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासून होते. मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत ठेवा आणि ध्येय स्पष्ट ठेवून प्रामाणिक मेहनत करा. अडचणी व अपयश ही यशाच्या प्रवासातील पायऱ्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि “मी करू शकते” हा आत्मविश्वास कायम ठेवा. योग्य दिशा, कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

🎯 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून कायद्याविषयी शंका निरसन करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा उपक्रमांमुळे शाळा परिसरात सुरक्षित व जागरूक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश पवार सर यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन कु. आर्या भगत व कु. अनुष्का कोल्हे या विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
या जनजागृती शिबिराला पीयूष नाईक, मनीषा अमृते, दिनेश पवार, मंगेश लंबे, संदीप चव्हाण, प्रयाग राठोड, न्यायालयीन कर्मचारी शशिकांत ढाले, पोलीस कर्मचारी गोपीचंद चव्हाण तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🎯 कायदे जनजागृती उपक्रमांची गरज अधोरेखित

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण, बालहक्क आणि सुरक्षिततेबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी अशा जनजागृती शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांना सुरक्षित व सक्षम बनविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे सर्वांनी नमूद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment