⛔ मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील २०२३च्या खून प्रकरणाचा न्यायालयात निकाल; १० हजारांचा दंड, न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास
✍️पांढरकवडा: अशफाक खान
किरकोळ वादातून कुऱ्हाडीने तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. श्री. मनीष कोठारी यांच्या न्यायालयाने प्रदीप उर्फ काल्या गोविंदराव भालशंकर (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. मार्डी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) याला दोषी ठरवत जन्मठेपेसह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
🎯 किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला
या प्रकरणाची घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील मौजा मार्डी येथे घडली होती. किरकोळ वादातून आरोपी प्रदीप उर्फ काल्या याने कैलास बंडू सलाम याच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. आरोपीने कैलासच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर तसेच शरीराच्या इतर भागांवर कुऱ्हाडीने गंभीर वार केले. या हल्ल्यात कैलास बंडू सलाम याचा मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी मृतकाचा मित्र अतुल पिंपळशेंडे, पोलीस पाटील प्रशांत पाटील आणि अभिजीत जुमळे यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचे अभियोजन पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

🎯 वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच मृतकाचे वडील बंडू गोपाळ सलाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पाहणी केल्यानंतर त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रकरणाचा तपास पूर्ण केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मारेगाव यांच्या न्यायालयात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.
🎯 आठ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रमेश मोरे यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. अभियोजन पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले.
यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अतुल पिंपळशेंडे, पोलीस पाटील प्रशांत पाटील आणि अभिजीत जुमळे यांच्या साक्षीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि अभियोजन पक्षाचा युक्तिवाद हे आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
सर्व पुरावे व साक्षींचे अवलोकन केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीष कोठारी यांनी आरोपी प्रदीप उर्फ काल्या गोविंदराव भालशंकर याला दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई रोहिणी कुमरे यांनी काम पाहिले.








