ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

एसबीआयच्या एटीएममधून १ लाख २ हजारांची फसवणूक

On: October 14, 2026 2:55 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ डेबिट कार्ड टाकूनही व्यवहार पूर्ण न झाल्याने पैसे अडकले; अनोळखी व्यक्तींनी मदतीच्या बहाण्याने रक्कम लंपास केल्याचा आरोप

✍️पांढरकवडा : अशफाक खान


भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीची तब्बल १ लाख २ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकल्यानंतरही व्यवहार पूर्ण न झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत दोन अनोळखी व्यक्तींनी मदतीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी अडेल्लू भुजाजी दूधबावणे (वय ५२, रा. पिंपळखुटी, ता. केळापूर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते पाटणबोरी येथील एसबीआयच्या शाखेतील खातेदार असून, दि. 13 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते.

एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकल्यानंतर काही कारणास्तव व्यवहार पूर्ण झाला नाही. त्याचवेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मदतीच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्तींनी कार्डाबाबत दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी अनुक्रमे ४९ हजार ५०० रुपये, २४ हजार ५०० रुपये, १० हजार रुपये, १० हजार रुपये आणि ८ हजार रुपये, अशा विविध व्यवहारांद्वारे एकूण १ लाख २ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घटना लक्षात आल्यानंतर अडेल्लू दूधबावणे यांनी तातडीने पांढरकवडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे.

🎯 एटीएम वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

दरम्यान, एटीएममधून पैसे काढताना अनोळखी व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. डेबिट कार्ड, एटीएम पिन, ओटीपी अथवा बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती इतरांना देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच एटीएममध्ये व्यवहार अर्धवट राहिल्यास किंवा कार्डाबाबत काही अडचण निर्माण झाल्यास अनोळखी व्यक्तीची मदत घेण्याऐवजी संबंधित बँकेशी तातडीने संपर्क साधावा.

एटीएम फसवणुकीच्या या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना तसेच एटीएमचा वापर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment