ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वाढदिवसाचा खर्च टाळून अद्वैत सोनु उप्पलवारचा समाजसेवेचा आदर्श!

On: October 31, 2026 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ गुल्लक फोडून मुख्यमंत्री सहायता निधीला २१०० रुपयांची मदत; अजितदादांचा ‘चांगला माणूस बन’ हा संदेश ठेवला मनात

✍️पांढरकवडा : सफी खान


वाढदिवस म्हटला की केक, सजावट, भेटवस्तू आणि मित्रमंडळींसोबतचा जल्लोष, हे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या एका चिमुकल्याच्या संवेदनशील कृतीने पांढरकवडा परिसरात कौतुकाची भावना निर्माण झाली आहे. अद्वैत राणी स्वप्नील (सोनू) उप्पलवार याने आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या गुल्लकमध्ये साठवलेली २ हजार १०० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती तसेच कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख लक्षात घेऊन यंदाचा वाढदिवस कोणताही अनावश्यक खर्च न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळत तोच पैसा सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय अद्वैत आणि त्याच्या कुटुंबीयांनी घेतला.

🎯 अजितदादांची आठवण आणि भावनिक नाते

अद्वैतच्या या उपक्रमामागे एक भावनिक आठवणही जोडलेली आहे. अद्वैतने मागील वर्षी अजितदादांची भेट घेतली होती. या भेटीत अजितदादांनी अद्वैतशी प्रेमाने संवाद साधत त्याला “मोठा हो, चांगला माणूस बन” असा मोलाचा संदेश दिला होता. या भेटीची आठवण अद्वैतच्या मनात आजही कायम आहे.

मात्र, यंदाच्या वाढदिवशी आपल्या लाडक्या अजितदादांची अनुपस्थिती अद्वैतसह कुटुंबीयांसाठी भावूक करणारी ठरली. अजितदादांनी दिलेला ‘चांगला माणूस बन’ हा संदेश मनात ठेवून अद्वैतने आपल्या गुल्लकातील बचत समाजाच्या उपयोगी यावी, या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीला २१०० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला.

🎯 बालवयातच सामाजिक जाणिवेचा आदर्श

लहान वयातच सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवत स्वतःच्या बचतीतून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या अद्वैतच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. वाढदिवसाचा आनंद केवळ केक कापण्यात किंवा मौजमजेत न घालवता, त्या आनंदाला सामाजिक कार्याची जोड देण्याचा त्याचा हा छोटासा प्रयत्न निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

आजच्या काळात वाढदिवस, समारंभ आणि विविध कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च पाहता, अद्वैतने आपल्या गुल्लकातील २१०० रुपयांची बचत समाजहितासाठी देत ‘वाढदिवस कसा साजरा करावा’ याचा एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

अद्वैतची ही संवेदनशील कृती केवळ आर्थिक मदत नसून, ‘चांगला माणूस बन’ या अजितदादांच्या संदेशाला कृतीतून दिलेला मानाचा मुजरा असल्याची भावना व्यक्त होत असून, त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment