ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी!

On: November 6, 2026 3:28 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ व्हॉलीबॉल, बॅडमिंटन व कराटेत विद्यार्थ्यांची राज्य आणि विभाग स्तरावर धडक

✍️वणी : महेश टिपले


क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, नांदपेरा रोड येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन २०२६-२७ मधील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्य व विभाग स्तरावर धडक मारली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

विद्यालयातील १४ वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवून विशेष यश संपादन केले. व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात कृष्णा संतोष कांबळे, तर बॅडमिंटनमध्ये साई सतीश तुराणकर याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राज्यस्तरावर प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या कामगिरीचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.

यासोबतच विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघानेही विभागस्तरीय स्पर्धेत आपल्या सांघिक कौशल्याची चमक दाखविली. मलकापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत कु. स्वरा मंगेश करंडे हिच्या नेतृत्वाखालील संघाने विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. या संघात कु. मानवी आशिष कटारिया, कु. कांचन सुभाष गुरनुले, कु. संबोधी सचिन वानखेडे, कु. भाविका खुशाल हेपट, कु. अंजली कृष्णकुमार पांडे, कु. आराध्या राजू येवले, कु. अनुश्री अमोल चंदीबिरीवार, कु. कुमुद चंद्रशेखर नीत, कु. अनाया अभय राजुलवार आणि कु. मृणाल राजू गोवारदिपे या खेळाडूंचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, जिद्द आणि क्रीडाकौशल्याच्या जोरावर स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली.

कराटे या क्रीडाप्रकारातही विद्यालयाने आपली यशस्वी परंपरा कायम राखली. १७ वर्षांखालील गटातील विद्यार्थी श्रीकल्प सेवक रुढे याने विभागस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळविला. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा वैभवात आणखी भर पडली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याची विद्यालयाची परंपरा या यशातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे विद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सन्माननीय सदस्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला व क्लबचे अन्य सदस्य, शैक्षणिक संचालक प्रशांत गोडे, प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे, क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विद्यालयासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी यावेळी दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment