ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

यवतमाळ तहसील कार्यालयातील प्रभारी निरिक्षण अधिकारी पुरवठा विभाग एसीबीच्या जाळ्यात; रेशन दुकानाचा परवाना वाचविण्यासाठी 50 हजाराची लाच..

On: November 5, 2026 3:54 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ खासगी मध्यस्थामार्फत स्वीकारली लाच; यवतमाळमधील कारवाईने महसूल विभागात खळबळ

✍️यवतमाळ : अशफाक खान


रेशन दुकानाविरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ नये, यासाठी अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागून ती खासगी मध्यस्थामार्फत स्वीकारल्याप्रकरणी यवतमाळ तहसील कार्यालयातील अव्वल कारकून तथा प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. निलेश भास्कर कळसकर (वय ३८) असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाचे नाव असून, चंद्रशेखर खुशालराव गायकी (वय ६०) या खासगी व्यक्तीलाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री यवतमाळ शहरात ही कारवाई करण्यात आली.

🎯 नेमके प्रकरण काय?

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४५ वर्षीय रेशन दुकानदार आहेत. त्यांच्या शासकीय स्वस्त धान्य दुकानाविरोधात गावातील एका व्यक्तीने यवतमाळ तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची चौकशी करून दुकानाच्या तपासणी अहवालातील गांभीर्य कमी करणे आणि तक्रारदाराच्या रेशन दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ नये, अशा स्वरूपाचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून तथा प्रभारी निरीक्षण अधिकारी निलेश कळसकर यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.

🎯 खासगी मध्यस्थामार्फत लाचेची मागणी

या तक्रारीच्या अनुषंगाने २७ आणि २९ ऑक्टोबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. मात्र, या दोन्ही दिवशी लाच मागणी निष्पन्न झाली नाही. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३१ ते ३.५६ वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय, यवतमाळ येथे करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान निलेश कळसकर यांनी खासगी व्यक्ती चंद्रशेखर गायकी याच्यामार्फत ५० हजार रुपये मागून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.

🎯 मोबाईल शॉपीजवळ सापळा; इनोव्हा कारमध्ये ठेवण्यास सांगितली रक्कम

लाच स्वीकारण्यासाठी एसीबीने ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१६ ते ९.१० या वेळेत श्रीकृष्ण मोबाईल शॉपी, बसस्थानक ते दत्त चौक मार्गावरील परिसरात सापळा रचला. यावेळी खासगी व्यक्ती चंद्रशेखर गायकी याने निलेश कळसकर यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली.

दरम्यान, गायकी याला निलेश कळसकर यांचा फोन आला. लाचेची रक्कम स्वीकारल्याची खात्री झाल्यानंतर कळसकर स्वतः सापळ्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी गायकी याच्याकडील लाचेची रक्कम एमएच ४२ एस २११५ क्रमांकाच्या इनोव्हा कारमध्ये ठेवण्यास सांगून ती स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष ही ५० हजार रुपयांची रक्कम कळसकर यांच्या ताब्यातून जप्त केली.

🎯 दोघेही एसीबीच्या ताब्यात; घरझडती सुरू

या प्रकरणी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. लोकसेवक निलेश कळसकर आणि खासगी व्यक्ती चंद्रशेखर गायकी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कळसकर यांच्या राहत्या घरी झडती घेण्याची कारवाईही सुरू होती.

विशेष म्हणजे, निलेश कळसकर यांच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी अकोला येथील रामदास पेठ पोलीस ठाण्यातही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

🎯 अमरावती एसीबीचे पथक कारवाईत सहभागी

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे, सुधीर चर्जन आणि चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश किटूकले यांचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

🎯 लाच मागितल्यास तक्रार करण्याचे एसीबीचे आवाहन

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांना अमरावती परिक्षेत्र कार्यालयाच्या ०७२१-२५५३०५५ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच व्हॉट्सॲप हेल्पलाइन १०६४ वर संपर्क साधता येणार आहे.

रेशन दुकानाचा परवाना वाचविण्याच्या नावाखाली लाचेची मागणी आणि खासगी मध्यस्थामार्फत झालेला पैशांचा व्यवहार यामुळे यवतमाळच्या तहसील कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment