⛔ श्री शारदा ज्ञानपीठ शाळेत पॉक्सो कायद्याबाबत जागृती; विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टचसह स्वसंरक्षणाचे धडे
✍️पांढरकवडा : सफी खान
बालकांचे बालपण सुरक्षित, निर्भय आणि आनंदी असावे, तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा, यासाठी केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठानद्वारा संचलित श्री शारदा ज्ञानपीठ शाळा, पांढरकवडा येथे ‘सुरक्षित बचपन अभियानांतर्गत’ विशेष शालेय जागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO) याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि अनुचित प्रसंगांमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. रामकृष्ण पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून विशेष सरकारी वकील श्री. गुप्ता , पांढरकवडा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. खंदारे , गहुकार मॅडम, ॲड. मसादे मॅडम, ॲड. गोपाल मोहुर्ले, पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजू मेश्राम, केंद्रप्रमुख श्री. निलेश गोपतवार, केंद्रप्रमुख पद्मावार मॅडम, सोनाली चिमुटे मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. अजीतसिंह चाहल, शाळेचे व्यवस्थापक श्री. तनवीर शेख, मुख्याध्यापक श्री. राहुल देवतळे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पेटेवार यांनी केले.

🎯 गुड टच-बॅड टचपासून पॉक्सो कायद्यापर्यंत मार्गदर्शन
मार्गदर्शन सत्रात गहुकार मॅडम यांनी मुलींच्या विविध समस्या आणि त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तसेच ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक स्पष्ट करून कोणताही अनुचित स्पर्श किंवा वर्तन जाणवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन केले.
ॲड. मसादे मॅडम यांनी पॉक्सो कायदा २०१२ मधील विविध तरतुदी, बालकांना कायद्याने मिळालेले संरक्षण आणि त्यांच्या अधिकारांची सविस्तर माहिती दिली. ॲड. गोपाल मोहुर्ले यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बालकांशी संबंधित वाढत्या गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पांढरकवडा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. खंदारे यांनी बालकांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास प्रथम माहिती अहवाल (FIR) कसा दाखल करावा, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया काय आहे आणि पॉक्सो कायद्यातील कलम २३ मध्ये कोणत्या तरतुदी आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अन्यायाविरोधात तक्रार करण्यास घाबरू नये आणि अशा प्रसंगी पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.
पंचायत समिती पांढरकवडा शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रप्रमुख श्री. निलेश गोपतवार यांनी विद्यार्थ्यांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती, विद्यार्थी सुरक्षा आणि शाळांमध्ये सुरक्षित व पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता यावर आपले विचार मांडले.
🎯 ‘NO-GO-TELL’मधून स्वसंरक्षणाचा कानमंत्र
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विशेष सरकारी वकील श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना ‘NO-GO-TELL’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला. एखाद्या व्यक्तीकडून अनुचित वर्तन किंवा त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास ठामपणे ‘नाही’ म्हणणे (NO), अशा धोकादायक परिस्थितीपासून त्वरित दूर जाणे (GO) आणि घडलेल्या प्रकाराची विश्वासू व्यक्ती, पालक किंवा शिक्षकांना माहिती देणे (TELL), या तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. या संदेशातून विद्यार्थ्यांनी संकटाच्या प्रसंगी न घाबरता योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास बाळगावा, असे त्यांनी आवाहन केले.
या जागृती मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना बालसुरक्षा, स्वतःचे अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, कायदेशीर संरक्षण आणि अनुचित प्रसंगांना सामोरे जाण्याच्या योग्य पद्धती याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. केवळ कायद्याची माहिती देणे नव्हे, तर प्रत्येक बालकाला स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग आणि सक्षम बनविणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल देवतळे यांनी केले. विद्यार्थीहित आणि बालसुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ही जागृती मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.










