✍️वणी / प्रतिनिधी,
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणाला कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल इस्माईल शेख (राजगडकर) यांना एमआयएम पक्षाकडून मिळालेल्या जाहीर पाठिंब्यामुळे वणीचे राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे. या राजकीय संगमाने शहरात हिंदू–मुस्लिम एकतेची नवीन लाट उसळली आहे.
🎯 ‘राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी!’ घोषणांनी दणाणले सभागृह
स्व. नानासाहेब गोहकार सभागृहात आयोजित पत्रकार परिषद भावनिक आणि ऐतिहासिक क्षणांनी परिपूर्ण होती. “राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी!” अशा उत्साहपूर्ण घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे दिलेल्या या घोषणांनी सौहार्दाचा शक्तिशाली संदेश दिला.
या पत्रकार परिषदेमुळे दोन्ही समाजांमध्ये ऐक्य, विश्वास आणि परस्पर सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ही घटना केवळ राजकीय नाही तर सामाजिक एकतेचे नवे पान लिहिणारी ठरल्याचे मान्यवरांनी सांगितले.

🎯 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि ऐतिहासिक घोषणा
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रदेश संघटन सचिव रजाक पठाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, भारत मालेकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल शेख आणि सर्व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.
एमआयएम पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष असीम हुसेन, प्रवक्ते दोस्तिक खान, युवा नेते रेहान खान व रेहान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांनी ऐतिहासिक पाठिंब्याची घोषणा करताना ‘वणीच्या विकासासाठी आणि एकतेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत’ असे स्पष्टपणे नमूद केले.
🎯 बहुतेक प्रभागांत राष्ट्रवादी–एमआयएम एकत्र, केवळ दोन प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत
एमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबतच बहुतेक नगरसेवक उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
वणीतील केवळ दोनच प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे नमूद करण्यात आले.
विशेषतः प्रभाग क्र. ९(ब) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता एमआयएमचे साकिब खान यांना थेट पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे मुस्लिम समाजात उत्साहाचे नवे वातावरण निर्माण झाले असून या प्रभागात चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
🎯 स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ
या पत्रकार परिषदेनंतर वणीतील संपूर्ण राजकीय परिस्थितीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. विरोधकांचे समीकरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवसांत नवा राजकीय खेळ उभा राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
शहरात जनतेतही चर्चेची लाट असून, “हिंदू–मुस्लिम हातात हात घालून आले… ही खरी वणीची ताकद! हा ऐतिहासिक क्षण वणीच्या भविष्याला स्थिर आणि प्रगत दिशेने नेणारा ठरेल,” अशा प्रतिक्रिया सभागृहात उपस्थितांनी व्यक्त केल्या.
🎯 एकतेचा संदेश – वणीसाठी नवे भविष्य?
राष्ट्रवादी आणि एमआयएम यांची ही मैत्री केवळ निवडणुकीपुरती नसून सामाजिक ऐक्यासाठीही महत्त्वाची ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर सहकार्याचा संदेश देत वणीला सांप्रदायिक ऐक्याचे आदर्श ठिकाण बनवण्याची प्रतिज्ञा केली.
ही घटना वणीच्या राजकारणाला नवा प्रवाह देणारी आणि शहरातील एकतेची नवी ओळख निर्माण करणारी ठरली आहे.










