✍️वणी : प्रतिनीधी
नाफेड मार्फत वणी खरेदी केंद्रावर करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीवर सध्या मोठा वाद निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाफेडची खरेदी एजन्सी असलेल्या व्हीसीएमएस (VCMS) संस्थेने खरेदी एजंट म्हणून शेतकरी खरेदी–विक्री संघ, वणी यांची नेमणूक करून शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केली होती. ही खरेदी तज्ञ एजन्सीच्या ग्रेडर (Grader) च्या माध्यमातून, नाफेडने निर्धारित केलेल्या नियम व प्रतवारीनुसार करण्यात आली होती.
खरेदी केलेले सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पोहोचविण्यात आले असता, तेथील साठा अधीक्षकांनी “निष्कृष्ट दर्जा, काडी–कचरा व मातीचे प्रमाण अधिक” असा शेरा देत संपूर्ण सोयाबीनचा साठा परत पाठवला. यामुळे शेतकरी, खरेदी संस्था व प्रशासन यांच्यात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
🎯 प्रतवारीनुसारच खरेदी झाल्याचा दावा
खरेदी केंद्रावर नाफेडने निश्चित केलेला प्रतवारी चार्ट व तक्ता स्पष्टपणे लावण्यात आलेला असून, त्यानुसारच सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याचा दावा संबंधित संस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रेडरांनी घेतलेल्या नमुन्यांमध्येही सोयाबीन प्रतवारीच्या निकषांमध्ये योग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वखार महामंडळाने दिलेला “निष्कृष्ट” दर्जाचा शेरा संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.
🎯 राजकीय हस्तक्षेप, वरिष्ठ पातळीवर चर्चा
या गंभीर विषयाची माहिती आज भारतीय जनता पार्टीचे माजी गृहराज्यमंत्री यांना देण्यात आली. ते दिल्लीहून नागपूर येथे सायंकाळी साडेतीन वाजता पोहोचले असताना, सोयाबीन खरेदी संदर्भातील संपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तात्काळ अकोला येथील नाफेड व्यवस्थापक श्री. राजगुरू साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
या चर्चेदरम्यान, राजगुरू साहेबांनी तालुका स्तरावरील समितीने लक्ष घालून योग्य तोडगा काढावा असे सूचित केले. त्यामुळे या प्रकरणात आता स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
🎯 सोमवारी संयुक्त प्रतवारी तपासणी
या पार्श्वभूमीवर, व्हीसीएमएसचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक श्री. देशमुख हे सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी वणी खरेदी केंद्राला भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत तसेच माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती संयुक्तपणे सोयाबीनचा नमुना काढून प्रतवारीची पुन्हा तपासणी करणार आहे.
या तपासणीनंतर प्रत्यक्ष अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
🎯 शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णयाची अपेक्षा
या संपूर्ण प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक, साठवणूक व आर्थिक व्यवहार अडचणीत आले आहेत. त्यामुळे प्रतवारीबाबत पारदर्शकता ठेवून, दोषारोपाऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा ठोस व तातडीचा निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
⛔दिनकर पावडे,
राज्य परिषद सदस्य, भाजपा महाराष्ट्र
तथा प्रदेश उपाध्यक्ष, किसान मोर्चा, भाजपा
यांनी प्रशासन व संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडवावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
— पुढील घडामोडींवर शेतकरी व प्रशासनाचे लक्ष केंद्रित असून, सोमवारच्या संयुक्त तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











