✍️पांढरकवडा | अशफाक खान
पुणे येथे दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रीय व ८ व्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पांढरकवडा येथील स्मार्ट किड अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा मान उंचावला आहे. देश-विदेशातील विविध राज्ये व राष्ट्रांमधून आलेल्या असंख्य स्पर्धकांशी मुकाबला करत पांढरकवड्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, वेगवान गणिती कौशल्य आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटविला.
या सर्व यशामागे स्मार्ट किड अबॅकस क्लासेस, पांढरकवडा यांच्या संचालिका प्रीती परेश बोरेले यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांवरील विश्वास महत्त्वाचा ठरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कमी वेळेत अचूक गणिती गणना करून परीक्षकांची व उपस्थितांची प्रशंसा मिळविली.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पांढरकवड्याचे जे विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामध्ये
आर्या पुल्लजवार, चारुल गावंडे, सिद्धी उके, युग चिंतावार, रेयांश कडूकार, मंथन चव्हाण, विहान राठोड, ईश्वरी येवले, भव्यं बोगावत, रुशिराज कर्णेवार, आरव सुंकेवर व कुशल सावरकर यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत पांढरकवड्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केले.
या स्पर्धेत रनरअप विजेते म्हणून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये –
चारुल सचिन गावंडे (E), मंथन किशोर चव्हाण (B) आणि आर्या अभय पुल्लजवार (E) यांचा गौरवपूर्ण समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या गटात उच्च गुण मिळवत स्पर्धेत मानाचे स्थान पटकावले.

या घवघवीत यशामुळे पांढरकवडा शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक, शिक्षक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि संचालिका प्रीती परेश बोरेले यांचे मार्गदर्शन हे प्रमुख कारण असल्याचे मत व्यक्त केले.
स्मार्ट किड अबॅकस क्लासेसच्या या यशामुळे पांढरकवड्यातील विद्यार्थ्यांमध्ये अबॅकस व मेंटल मॅथ्स शिक्षणाबाबत उत्साह वाढला असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.











