✍️पांढरकवडा | अशफाक खान
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला धमकावल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात आरोपी प्रशांत ठाकरे (वय २५, रा. नायगाव, ता. वणी, जि. यवतमाळ) यास २० वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र व विशेष न्यायाधीश केळापूर, मा. श्री. अभिजीत एम. देशमुख यांच्या न्यायालयाने आज दिनांक ०२/०१/२०२६ रोजी दिला.
🎯 घटनेची थोडक्यात हकिकत
मौजा नायगाव, ता. वणी येथे सुमारे एक वर्षापूर्वी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी हा पीडितेच्या घरासमोर राहत होता. एके संध्याकाळी पीडितेचे आई-वडील घराबाहेर कामावर गेलेले असताना, आरोपीने संधी साधून तिच्या घरात प्रवेश केला.आरोपीने पीडितेचे आई-वडील व भाऊ यांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केला. धमकीमुळे भयभीत झालेल्या पीडितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही.
🎯 वैद्यकीय तपासणीतून उघडकीस आले सत्य
काही कालावधीनंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम वणी येथे व नंतर नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले. सोनोग्राफी व वैद्यकीय तपासणीत पीडिता २० आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालय पोलिस चौकी येथे दिली.
🎯 गुन्ह्याची नोंद व तपास
यानंतर पोलीस स्टेशन अजनी, नागपूर यांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६, ३७६ (२)(एन), ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा पो.स्टे. वणी हद्दीत घडल्याने तो पो.स्टे. वणी येथे वर्ग करण्यात आला. तेथे गुन्हा क्रमांक ६२६/२०२३ नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. मायाताई चाटसे यांनी केला. तपासात आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरण विशेष न्यायालय, केळापूर येथे न्यायप्रविष्ट करण्यात आले.
🎯 न्यायालयीन सुनावणी
अभियोग पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. प्रशांत अ. मानकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
या प्रकरणात एकूण ७ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेचा जबाब, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपास अधिकाऱ्यांचे पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.
🎯 शिक्षेचा तपशील
न्यायालयाने आरोपीस पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली :
🔺POCSO Act २०१२ कलम ४
१० वर्षे सश्रम कारावास
₹७,०००/- दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास
🔺POCSO Act २०१२ कलम ६
२० वर्षे सश्रम कारावास
₹१०,०००/- दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास
🔺भादंवि कलम ५०६ (धमकी)
२ वर्षे सश्रम कारावास
₹३,०००/- दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास
🔺भादंवि कलम ३७६ (२)(एन) मधील शिक्षा POCSO Act कलम ४२ नुसार वरील शिक्षेत समाविष्ट करण्यात आली असून स्वतंत्र शिक्षा देण्यात आलेली नाही.
🔺 सर्व शिक्षा एकत्रितपणे (Concurrent) भोगावयाच्या आहेत. प्रकरणाची प्रभावी पैरवी पोलीस नाईक श्री. संतोष मडावी (ब.नं. ७९२) यांनी केली.
🎯 न्यायालयाचा कडक संदेश
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन होणारच, असा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे. पीडितेला न्याय मिळवून देणारा हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला आहे.











