✍️वणी : प्रतिनीधी
भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने नागपूर येथे भव्य सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रेरणादायी व गौरवपूर्ण सोहळ्यात समाजासाठी कला, साहित्य, पत्रकारिता आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सातत्याने योगदान देणारे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक व संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना सन २०२६ चा समाज गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सन २००८ पासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रज्वलन’ या नावाने तालुका ते राज्यस्तरीय दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मारेगाव व वणी येथे डॉ. विनोदकुमार आदे यांनी सातत्याने सावित्रीमाई फुले यांना मानवंदना अर्पण केली आहे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मारेगाव व वणी येथे मतदान, हुंडाबळी, व्यसनाधीनता, बेरोजगारी, देशभक्ती, सामाजिक विषमता, तसेच कोरोना यांसारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनात्मक पोस्टर, रांगोळ्या व कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी जनजागृती केली आहे.
सामाजिक विषयांवर आधारित गीते स्वतः लिहून व सादर करून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचवले. यासोबतच त्यांनी लघुचित्रपटांची निर्मिती करून समाजातील वास्तव, वेदना व प्रश्न कलात्मक पद्धतीने मांडले आहेत. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून ‘टुकार’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. याशिवाय ‘अजून माझा बाप काही केल्या मरत नाही’ हा कथासंग्रह तसेच ‘बाप’ व ‘तडतडात’ हे दोन कवितासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहेत.
सध्या डॉ. विनोदकुमार आदे हे वणी न्यूज एक्सप्रेस या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. एक उत्कृष्ट ग्राफिक्स डिझायनर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, शिल्पकला, रांगोळी कला, गायन, लेखन, कविता, संगीत, गीतलेखन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अशा विविध कलागुणांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. कला व संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली आहे.
श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकाचे औचित्य साधून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास मांडणारी ‘फुललेली बाग’ ही स्मरणिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेमध्ये डॉ. विनोदकुमार आदे यांनी लिहिलेला ‘माझे माहेर नवरगाव’ हा भावनिक व सविस्तर लेख समाविष्ट असून, त्याला समाजबांधवांकडून विशेष प्रशंसा मिळाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मंचावर चंद्रपूर येथील प्रसिद्ध तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. अभिलाषाताई गावतूरे, एस.व्ही.ई.टी., नागपूरचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकुळे, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका व संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. अलकाताई बी. झाडे, चंद्रपूरचे एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतूरे, नागपूरच्या माजी नगरसेविका सुनंदाताई नाल्हे, माळी वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे तसेच श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेचे अध्यक्ष कृष्णा महादुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा जागर करत समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या डॉ. विनोदकुमार आदे यांचा समाज गौरव पुरस्काराने झालेला सन्मान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.









