⛔गोपनीय माहितीच्या आधारे साखरा शेतशिवारात छापा; चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
✍️पांढरकवडा : अशफाक खान
कत्तलीसाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गोवंश जनावरे नेण्याच्या तयारीत असलेल्या गोवंश तस्करांवर पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई करून 12 गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना 17 जून रोजी रात्री सुमारे 8.45 वाजता गोपनीय माहिती मिळाली होती की, ग्राम उमरी येथील जनावर व्यापारी एजाज शेख बाबा कुरेशी व साखरा येथील सुभाष आत्राम यांनी साखरा शेतशिवारातील शेरे-ए-पंजाब ढाब्याच्या मागील नाल्याजवळ काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी आदिलाबाद (तेलंगणा) येथे नेण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोहेकॉ. विलास जाधव, पोहेकॉ. रजनीकांत पाटील व नापोकॉ. सचिन काकडे यांनी तत्काळ छापा टाकला.
कारवाईदरम्यान 12 गोवंश बैल जनावरे (अंदाजे किंमत 3 लाख 80 हजार रुपये) तसेच पिकअप वाहन क्रमांक MH-40-DC-2843 (अंदाजे किंमत 5 लाख रुपये) असा एकूण 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेली 12 गोवंश जनावरे नगर परिषद पांढरकवडा कोंडवाड्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
या प्रकरणी सुभाष विठ्ठल आत्राम (वय 39, रा. साखरा, ता. केळापूर), दुर्गेश किशोर कातोरे (वय 25, रा. टवेपार, जि. भंडारा), आदित्य निलेश शेंडे (वय 23, रा. भगतसिंग वार्ड, नवीन टाकळी, जि. भंडारा) तसेच जनावर मालक एजाज शेख बाबा कुरेशी (रा. उमरी रोड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 1995), प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 व भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोउपनिरीक्षक नितीन सुशीर, पोहेकॉ. विलास जाधव, पोहेकॉ. रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनिल राठोड, नापोकॉ. सचिन काकडे, पोकॉ. राजू मुत्तलवार यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. सुनिल कुंटावार करीत आहेत.











