✍️वणी : प्रतिनीधी
राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण होत असताना वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. यासंदर्भात मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना निवेदन सादर करण्यात आले.
मनसेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात स्मार्ट मीटर योजना ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी नसून विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी राबविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या माध्यमातून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याची टीकाही करण्यात आली.
यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि महावितरणच्या भूमिकेतील विसंगतीवर प्रश्न उपस्थित केले. “मुख्यमंत्री सार्वजनिकरित्या स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे सांगतात, मात्र दुसरीकडे महावितरण ग्राहकांना सक्तीचे संदेश (SMS) पाठवत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाही की जनतेची दिशाभूल केली जात आहे?” असा सवाल मनसेने उपस्थित केला.
ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खासगी मालमत्तेत स्मार्ट मीटर बसविणे योग्य नसल्याचे सांगत मनसेने अशा प्रकारच्या कारवाईला विरोध दर्शविला. तसेच स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारावरही पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी महावितरणचे ‘रिकव्हरी एजंट’ म्हणून काम करणे थांबवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
फाल्गुन गोहोकार म्हणाले, “नागरिकांच्या परवानगीशिवाय बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाला किंवा विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर मनसे तीव्र आंदोलन उभारेल. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाची राहील.”
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य अभियंता (महावितरण) पांढरकवडा, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच पोलीस निरीक्षक वणी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करताना मनसेचे महेश हातगावकर, धीरज पिदुरकर, गोविंद थेरे, प्रविण कळसकर, प्रतिक बुरडकर, सुजित मेश्राम, गणेश खरवडे, मनोज उरकुडे, सुरज काकडे, धीरज बगवा, सोमेश्वर ढवस, प्रफुल सातपुते, मंगेश ढेंगळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.








