ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लाचखोरीचा प्रयत्न उघडकीस : सहायक जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता,  यवतमाळ जलसंपदा विभागाचा उपअभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल

On: January 9, 2026 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, पांढरकवडा येथे घडलेल्या एका घटनेमुळे प्रशासनातील प्रामाणिकपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित राजेंद्र रंजन यांनी लाच देण्याचा प्रयत्न होताच क्षणाचाही विलंब न करता थेट पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या या तत्परतेमुळे यवतमाळ जलसंपदा विभागाचा उपअभियंता आणि एका ठेकेदाराचा लाचखोरीचा डाव उघडकीस आला असून, दोघांविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात त्रिलोक जयप्रकाश त्रिपाठी (वय ३५, रा. यवतमाळ) – जलसंपदा विभागाचा उपअभियंता आणि कामेश विरान्ना डुल्ला (वय ४०, रा. नागपूर) – ठेकेदार  अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आयएएस अधिकारी अमित रंजन यांच्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबीन बन्सल करीत आहेत.

🎯 नेमके प्रकरण काय?
८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास जलसंपदा विभागाचे उपअभियंता त्रिलोक त्रिपाठी हे पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन यांची भेट घेण्यासाठी आले. त्यांनी कोची–आंबेझरी भूसंपादन प्रकल्पासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. यासोबतच संबंधित ठेकेदाराला वाळू पुरवठा व अन्य प्रशासकीय अडचणी येत असल्याची बाब मांडली.

यावर अमित रंजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भूसंपादनाबाबत उच्च न्यायालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यानुसार प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यामुळे भूसंपादनाला काही प्रमाणात विलंब होणार असून, नवीन अध्यादेशाची आवश्यकता भासू शकते. मात्र उपअभियंता त्रिपाठी हे या भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसून आले.

याच वेळी “ठेकेदार स्वतः तुम्हाला भेटू इच्छितो,” असे सांगत अप्रत्यक्षपणे आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रंजन यांनी अशी भेट अनावश्यक असल्याचे सांगून, “तुमच्या कार्यकारी अभियंत्यांना अधिकृतरीत्या भेटीस पाठवा,” असे स्पष्ट निर्देश दिले. यानंतर त्रिपाठी कार्यालयातून निघून गेले.

दुपारी पुन्हा कार्यालयात आगमन आणि लाच देण्याचा प्रयत्न
दुपारी सुमारे ३ ते ३.१५ वाजताच्या सुमारास त्रिलोक त्रिपाठी हे ठेकेदार कामेश डुल्ला यांच्यासोबत पुन्हा सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्या कार्यालयात आले. पुन्हा भूसंपादनाच्या विषयावर चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू असतानाच, दोघांनी मिळून रंजन यांना पाकिट देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रंजन यांनी तत्काळ विचारणा केली असता, “हे पाकिट कार्यकारी अभियंता नितीन बनसोड यांनीच तुम्हाला द्यायला सांगितले आहे,” असे आरोपी सांगू लागले. मात्र रंजन यांनी कोणतीही तडजोड न करता ते पाकिट घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्वरित पोलिसांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

🎯 सीसीटीव्हीत घटना कैद
महत्त्वाची बाब म्हणजे, लाच देण्याचा संपूर्ण प्रयत्न सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे तपासात महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले असून, प्रकरण अधिक भक्कम झाले आहे.

🎯 पोलिसांची तत्काळ कारवाई
रंजन यांच्या तक्रारीनंतर पांढरकवडा पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्रिलोक त्रिपाठी आणि कामेश डुल्ला यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या लाचखोरीमागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

🎯 प्रशासनातील प्रामाणिकपणाचे उदाहरण
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्या ठाम आणि निर्भीड भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढत्या लाचखोरीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी अशा प्रकारे कायद्याच्या बाजूने ठाम उभे राहिल्यास भ्रष्टाचाराला निश्चितच आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

केळापूर येथील चिमुकल्यांचे  उडानपूला विरोधात आंदोलन, अंडरपासची एकमुखी मागणी

पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकल्याची अमानुष हत्या  प्रकरणी: बापाला जन्मठेप,  पांढरकवडा सत्र न्यायालयाचा कठोर निकाल

पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा बुलंद; सातही विषय समित्यांवर शिवसेना (शिंदे गट)चे निर्विवाद वर्चस्व, नगराध्यक्ष भाजपकडे, मात्र सत्तेची सूत्रे पूर्णतः शिवसेनेकडे

उमरी–करंजी रोडवर भीषण अपघात : ट्रकच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू,  एक तरुणी गंभीर जखमी

पांढरकवडा येथील सिटी प्राइड स्कूल येथे राष्ट्रिय युवा दिनानिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन संपन्न,स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी युवकांना प्रेरणा देण्याचा संदेश

काळ्या बाजारात जाणाऱ्या 120 क्विंटल तांदळासह ट्रक जप्त उपविभागीय अधिकारी पथकाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

Leave a Comment