✍️पांढरकवडा | अशफाक खान
कौटुंबिक वादातून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला जिवंतपणी जमिनीवर आपटून, बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करणाऱ्या बापास सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. केळापूर तालुक्यातील गणेशपूर (वाई) येथील ही हृदयद्रावक घटना असून, तब्बल पाच वर्षांच्या न्यायप्रक्रियेनंतर अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
मौजा गणेशपूर (वाई), ता. केळापूर, जि. यवतमाळ येथे दिनांक १७ मे २०२० रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आरोपी पिंटू सुधाकर चव्हाण (वय २७) याने घरगुती वादातून प्रथम आपल्या मोठ्या मुलगा शिवम याला मारहाण केली. यावेळी पत्नी सैनाबाई पिंटू चव्हाण हिने पतीला जाब विचारत का मारतो असे विचारले असता, आरोपीने काठीने पत्नीला मारहाण केली. या कारणावरून पती-पत्नीमध्ये तीव्र वाद झाला.
वादाच्या भरात आरोपीने पत्नीच्या कुशीत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्या सावनला जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर घरालगत असलेल्या बाबूलाल राठोड यांच्या शेतात नेऊन, सावनचे दोन्ही पाय धरून त्याला वारंवार जोराने जमिनीवर आपटले. एवढ्यावर न थांबता आरोपीने बुक्याबुक्याने सावनच्या डोक्यावर, तोंडावर व छातीवर बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्यात सावनचा जागीच मृत्यू झाला.
🎯 गुन्ह्याची नोंद व तपास
या घटनेची तक्रार दिनांक १८ मे २०२० रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी पिंटू सुधाकर चव्हाण याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३०२ (खून), ३२३ (मारहाण), ३२४ (धोकादायक शस्त्राने मारहाण) व ५०४ (अपमान) अन्वये गुन्हा क्रमांक ३७५/२०२० दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान प्रथमदर्शनी आरोपीनेच हा गुन्हा केल्याचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याने, आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र सत्र न्यायालय, केळापूर येथे दाखल करण्यात आले.
🎯 न्यायालयीन सुनावणी व युक्तिवाद
अभियोग पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रमेश डी. मोरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. अभियोग पक्षातर्फे एकूण पाच महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळ पंचनामा तसेच तपासातील पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. अभियोग पक्षाने सादर केलेले पुरावे ठोस व विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
🎯 न्यायालयाचा निकाल
या प्रकरणात सर्व बाजू तपासून व पुराव्यांचे बारकाईने मूल्यमापन करून, विद्यमान सत्र न्यायाधीश श्री. अभिजित देशमुख (सत्र न्यायालय, केळापूर) यांनी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी निकाल सुनावला.
न्यायालयाने आरोपी पिंटू सुधाकर चव्हाण यास—
भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १०,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास,
भा.दं.वि. कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवस सश्रम कारावास,
भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत २ वर्ष सश्रम कारावास व १,००० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास
अशी शिक्षा ठोठावली. तसेच सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश देण्यात आला.
🎯 पोलिसांची भूमिका
या प्रकरणात साक्षीदार हजर ठेवण्याची जबाबदारी पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोहर कुमरे (ब. नं. १९७९) यांनी यशस्वीपणे पार पाडली. तपास व न्यायालयीन प्रक्रियेत पोलिसांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली.
🎯 समाजात तीव्र प्रतिक्रिया
पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या बापाला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. या निकालामुळे अशा अमानुष कृत्यांना आळा बसेल, तसेच समाजात कठोर संदेश जाईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.










