✍️वणी | प्रतिनिधी
खरीप हंगामात ‘विगर’ (Vigar) कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे वणी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार निवेदने सादर करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रश्नात आक्रमक भूमिका घेतली असून, ‘विगर’ कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाका आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा २८ जानेवारी रोजी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.
🎯 शेतकरी हतबल; प्रशासनाची उदासीनता
खरीप हंगाम २०२५–२६ मध्ये ‘विगर’ कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवलेच नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दर्जाचे पीक आले. परिणामी उत्पादन घटले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.
या प्रकरणी २६ नोव्हेंबर आणि १६ डिसेंबर २०२५ रोजी कृषी विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असून, गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
🎯 मनसेच्या ठाम मागण्या
मनसेने प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
• ब्लॅकलिस्ट कारवाई: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ‘विगर’ कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावे.
• संयुक्त बैठक: उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कंपनी प्रतिनिधी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने तोडगा काढावा.
• तातडीची भरपाई: झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
🎯 प्रशासन जबाबदार राहील – गोहोकार
“आम्ही वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदने दिली, मात्र प्रशासन ढिम्म राहिले. जर २८ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला.
🎯 उपस्थित मान्यवर
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, गोविंदराव थेरे, विनोद कुचनकर, बंडू येसेकर, प्रमोद कोल्हे, सुरज काकडे, प्रवीण कळसकर, प्रतीक बुरटकर, लक्ष्मण उपरे, धीरज भगवा, प्रवीण दुमोरे, प्रवीण मांडवकर, गजानन बोंडे, अमोल जेऊरकर, सचिन बोदाने, सुरेश विधाते, गजानन पानघटे, नागेश पथाडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
स्मरणपत्र सादर
या प्रकरणी आज उपविभागीय अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या गंभीर प्रकरणावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण वणी उपविभागाचे लक्ष लागले आहे.









