✍️पांढरकवडा | अशफाक खान
पांढरकवडा शहरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, माजी नगराध्यक्ष स्वर्गीय श्यामसुंदरजी झाझरिया यांच्या धर्मपत्नी तथा शहरातील सुप्रसिद्ध झाझरिया कुटुंबाच्या आधारस्तंभ श्रीमती किरणदेवी श्यामसुंदर झाझरिया (वय ७२ वर्षे) यांचे आज सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी 10:20 वाजताच्या सुमारास अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पांढरकवडा शहरात शोककळा पसरली आहे.
श्रीमती किरणदेवी झाझरिया या अत्यंत शांत, धार्मिक, सेवाभावी व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. सामाजिक, धार्मिक तसेच कौटुंबिक जीवनात त्यांनी नेहमीच संयम, संस्कार आणि स्नेहाची भूमिका बजावली. त्यांच्या सौम्य वागणुकीमुळे त्या परिसरात सर्वांच्या परिचित व आदरणीय होत्या.
त्यांचे पती स्वर्गीय श्यामसुंदरजी झाझरिया यांनी पांढरकवडा नगर परिषदेत काही काळ नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात श्रीमती किरणदेवी यांचा मोलाचा पाठिंबा नेहमीच लाभत असे.
त्यांच्या पश्चात सतीश झाझरिया व गिरीश झाझरिया ही दोन मुले, तीन विवाहित मुली, तसेच नातू-नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने झाझरिया कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
🎯 अंत्ययात्रेचा कार्यक्रम :
स्वर्गीय श्रीमती किरणदेवी झाझरिया यांची अंतिम यात्रा आज सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या आखाडा रोडवरील श्याम नगरी येथील निवासस्थानातून निघणार असून, त्यानंतर पांढरकवडातील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच शहरातील नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त करून झाझरिया कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.










