✍️पांढरकवडा : अशफाक खान
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चालबर्ड्डी ता. केळापूर येथील रहिवाशी असलेले साईकृष्णा विलास रंगनेनिवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुरज अनिलकुमार गुप्ता यांनी दि. ५ मार्च २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. या नियुक्तीमुळे भाजप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाध्यक्ष सुरज गुप्ता यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, साईकृष्णा रंगनेनिवार यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक तसेच विविध सर्वसमावेशक क्षेत्रांमध्ये सक्रियपणे काम करत संघटनेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा, समर्पण आणि संघटनात्मक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना साईकृष्णा रंगनेनिवार यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे, युवकांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न वाढवावेत आणि विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांद्वारे पक्षाची ताकद वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सुरज गुप्ता यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, साईकृष्णा रंगनेनिवार यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे भाजयुमोच्या संघटनात्मक कार्याला निश्चितच नवे बळ मिळेल. युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचवून संघटना अधिक व्यापक करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल साईकृष्णा रंगनेनिवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले असून, पक्षाने दिलेल्या विश्वासास पात्र ठरत संघटन मजबूत करण्यासाठी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्त्यांकडून साईकृष्णा रंगनेनिवार यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भाजयुमो यवतमाळ जिल्हा कार्यालय सिव्हील लाईन, पुनम चौक, पोस्टल ग्राऊंड जवळ येथे असून येथून जिल्हाभरात युवकांना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. “महाराष्ट्र आता थांबणार नाही” या ध्येयवाक्यासह भाजयुमो युवकांमध्ये राष्ट्रवादी विचार रुजविण्यासाठी कार्यरत आहे.
भाजयुमोच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.









