✍️पांढरकवडा: अशफाक खान
यवतमाळ जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यटन विकास यांचा समतोल साधत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पांढरकवडा प्रादेशिक वनविभागाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून दि. २१ मार्च २०२६ रोजी जांब (हेटी) येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या ३७ किलोमीटर लांबीच्या पर्यटन सफारी मार्गाचे भव्य उद्घाटन आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक श्री. यशवंत बहाळे, सहायक वनसंरक्षक श्री. विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी, जांब (हेटी) येथील सरपंच श्री. रमेश सिडाम, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जांब (हेटी) येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच पर्यटकांसाठी सज्ज करण्यात आलेल्या सफारी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून पर्यटन सफारीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक निवडलेल्या निसर्ग मार्गदर्शक तरुणांना टी-शर्ट व कॅपचे वितरण करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
यवतमाळ जिल्हा हा विस्तीर्ण वनक्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीव संपत्तीने समृद्ध आहे. विशेषतः टिपेश्वर अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध असून या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, लांडगा, कोल्हा यांसारखे मांसभक्षी प्राणी तसेच चितळ, नीलगाय, काळवीट, ससा यांसारखे तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. याशिवाय विविध पक्षी, फुलपाखरे आणि दुर्मिळ वनस्पती यांमुळे हा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत समृद्ध मानला जातो.

या नैसर्गिक संपत्तीचा शाश्वत उपयोग करून पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. एम.एस. रेड्डी (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या पुढाकाराने हा सफारी मार्ग विकसित करण्यात आला आहे. पांढरकवडा वनविभागांतर्गत पारवा आणि घाटंजी वनपरिक्षेत्र तसेच वनविकास महामंडळ (FDCM) क्षेत्रातून जाणारा हा मार्ग पूर्वी अस्तित्वात असलेल्या कच्च्या रस्त्याचे सुसज्ज रूपांतर करून पर्यटकांसाठी सुरक्षित व सोयीस्कर करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवत या मार्गावर सहा कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून त्यामुळे वन्यजीवांना वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढून त्यांच्या संवर्धनास हातभार लागणार आहे. तसेच संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक बसविण्यात आले असून पर्यटकांना सहज मार्गदर्शन मिळणार आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी जांब (हेटी) येथे मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात आले असून हे ठिकाण पांढरकवड्यापासून सुमारे १६ किमी आणि यवतमाळपासून अंदाजे ५१ किमी अंतरावर आहे. सध्या सफारीसाठी २० नोंदणीकृत जिप्सी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून केवळ नोंदणीकृत वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
यासोबतच जांब, पारवा आणि इंजाळा परिसरातील १५ सुशिक्षित युवकांची निसर्ग मार्गदर्शक म्हणून निवड करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराची नवी दिशा मिळाली आहे.
सफारी शुल्क संरचनेनुसार प्रति वाहन ३००० रुपये, मार्गदर्शक शुल्क ४०० रुपये प्रति फेरी आणि शासकीय शुल्क १००० रुपये प्रति फेरी असे निश्चित करण्यात आले आहे. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी सफारी बंद राहणार असून सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६ या वेळेत पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशद्वार परिसरात तिकीटघर, विश्रांती सुविधा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या बुकिंग ऑफलाइन पद्धतीने सुरू असून लवकरच ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध माध्यमांद्वारे या पर्यटन प्रकल्पाची व्यापक प्रसिद्धी करण्याचेही नियोजन आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार मा. राजूभाऊ तोडसाम यांनी वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, हा सफारी मार्ग पावसाळ्यातही सुरू राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. वन्यजीवांना कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. तसेच जांब तलाव येथे जलपर्यटनाची सुविधा विकसित करून स्थानिक आदिवासी बांधवांना त्यांच्या संस्कृतीचे जतन करत रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल.
या प्रकल्पामुळे जांब आणि परिसरातील सुमारे ५० युवकांना वाहनचालक, मार्गदर्शक, गेट व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत रोजगार उपलब्ध होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षणाबाबत स्थानिकांचा सहभाग वाढून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्य वनसंरक्षक यांच्या हस्ते जांब पर्यटन प्रवेशद्वारातून पहिल्यांदाच सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नवीन सफारी मार्गामुळे पांढरकवडा परिसरात निसर्ग पर्यटनाची मोठी क्षमता निर्माण झाली असून भविष्यात यवतमाळ जिल्हा राज्याच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— यशवंत बहाळे
उपवनसंरक्षक,
वनविभाग पांढरकवडा








