✍️वणी प्रतिनिधी :
विश्वरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त वणी येथे भीम आर्मी, भारत एकता मिशन तर्फे प्रबोधनपर भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या सांस्कृतिक उपक्रमातून समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे. गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता गव्हर्नमेंट हायस्कूल, पोस्ट ऑफिसजवळ, वणी येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील युवा, तडफदार गायक व प्रबोधनकार सुरज अतिश व त्यांचा संच (नागपूर) यांचे सादरीकरण होय. त्यांच्या जोशपूर्ण, विचारप्रवर्तक आणि आंबेडकरी विचारांनी प्रेरित गीतांमधून उपस्थितांना सामाजिक समतेचा, बंधुभावाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश मिळणार आहे. त्यांच्या सादरीकरणातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी वणी मा. श्री. किशोरजी गजलवार विराजमान राहणार आहेत. याशिवाय विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मा. श्री. संजयभाऊ खाडे तसेच मा. श्री. आशिष भाऊ खुलसंगे यांची उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार असून, सामाजिक बांधिलकी आणि विचारांची देवाणघेवाण याला नवे परिमाण मिळणार आहे.
या प्रबोधनपर कार्यक्रमाला परिसरातील आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजातील अंधश्रद्धा, विषमता व अन्यायाविरुद्ध जागर निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
भीम आर्मी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र भाऊ मेश्राम यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “या प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश आत्मसात करावा व आंबेडकरी विचारांची दिशा अधिक बळकट करावी.”
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम (जिल्हाध्यक्ष) असून, यवतमाळ जिल्ह्यातील भीम आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाची आखणी केली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामुळे वणी शहरात आंबेडकरी चळवळीचे विचार अधिक व्यापकपणे पोहोचतील, तसेच युवकांमध्ये सामाजिक भान आणि सकारात्मक परिवर्तनाची जाणीव निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








