✍️पांढरकवडा : अशफाक खान
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त पांढरकवडा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला.
या मार्चमध्ये 6 अधिकारी, 40 पोलीस कर्मचारी तसेच 65 होमगार्ड जवानांचा सहभाग होता. याशिवाय पोलिसांच्या वाहनांचा ताफाही या रूट मार्चमध्ये सहभागी झाला होता. शहरातील प्रमुख रस्ते व आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या रॅली मार्गांवरून हा मार्च काढण्यात आला.दरवर्षी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध सामाजिक संघटनांकडून मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या सर्व कार्यक्रमांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. तसेच संभाव्य गोंधळ किंवा अफवांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जयंती उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करावा, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कायद्याचे पालन करावे. या उपक्रमामुळे शहरात पोलीसांची मजबूत उपस्थिती जाणवली असून, नागरिकांनीही या रूट मार्चचे स्वागत करत प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.










