✍️पांढरकवडा | अशफाक खान
पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंजी गावात इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याच्या विरोधात पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोनसह एकूण ₹९६,०१० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 24 एप्रिल रोजी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या IPL सामन्यावर काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पैशांची हार-जीत लावून क्रिकेट सट्टा चालवत असल्याची खात्रीलायक माहिती पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने करंजी येथे तात्काळ छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपी १) शशांक दिवाकर मुडे (वय २६ वर्ष), २) मंगेश विनायक खांदनकर (वय २७ वर्ष), ३) नंदू हिरालाल कांबळे (वय २७ वर्ष) हे लोकांकडून पैसे स्वीकारून ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे प्रत्यक्ष आढळून आले.
या तिघांसह ऑनलाईन सट्ट्यात सहभागी असलेले इतर आरोपी — ४) बाळू पाटील, ५) प्रणय वानखडे, ६) ईश्वर अक्कलवार, ७) पवन बांधुरकर (रा. कोठोडा), ८) बुद्धराज पुडके (रा. करंजी) तसेच सट्ट्याची उतारी घेणारा आरोपी ९) विक्की श्रावणकुमार अरोरा (रा. पुलगाव, जि. वर्धा) — यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५६१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) व ४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.एकूण मुद्देमाल किंमत ₹९६,०१० इतकी आहे. मोबाईलद्वारे ऑनलाईन सट्टा व्यवहार चालवला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (यवतमाळ), अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रौबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. नितीन सुशिर, पो.हवा. प्रमोद जुनूनकर, विलास जाधव, रजनिकांत पाटील, सुनिल राठोड, सचिन काकडे आणि राजू मुत्यलवार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.








