✍️पांढरकवडा– अशफाक खान
केळापूर तालुक्यातील रुंझा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उदयोन्मुख युवा नेतृत्व शहजाद सिद्दीकी यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. हा प्रवेश सोहळा यवतमाळ येथील मातोश्री प्रतीक्षालयात पार पडला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या भव्य प्रवेश सोहळ्यात शहजाद सिद्दीकी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे विशेषतः रुंझा मंडळातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युवकांमध्ये मजबूत पकड असलेले आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करणारे शहजाद सिद्दीकी यांचे शिंदे सेनेत आगमन पक्ष संघटनासाठी मोठा बळ ठरणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पक्षाच्या भक्कम उभारणीसाठी शहजाद सिद्दीकी यांसारख्या जिद्दी आणि कार्यक्षम युवा नेतृत्वाची नितांत गरज आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल आणि स्थानिक पातळीवर विकासकामांना अधिक गती मिळेल.”
प्रवेशानंतर बोलताना शहजाद सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “पालकमंत्री संजय राठोड यांच्या सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाखाली परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासकामांना चालना देण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.” त्यांनी आपल्या सर्व समर्थकांचे आभार मानत, पक्षाच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास पश्चिम विदर्भ प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा प्रमुख राजुदास जाधव, गजानन डोमाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
शहजाद सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात रुंझा आणि परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







