✍️वणी: प्रतिनीधी
खरीप हंगाम तोंडावर येत असताना शेतकरी वर्ग मशागत, बियाणे व खत खरेदीच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र या पार्श्वभूमीवर वणी उपविभागातील अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. खतांच्या विक्रीसोबत अनावश्यक वस्तू जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या ‘लिंकिंग’ प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, अनेक कृषी केंद्र चालक “आमच्याकडून बी-बियाणे घेतले तरच खत मिळेल” अशी अट घालत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांसोबत बोगस टॉनिक, कीटकनाशके किंवा दुय्यम दर्जाची खते जबरदस्तीने घ्यावी लागत आहेत.
याशिवाय काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याच खतांची जादा दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
🎯 मनसेच्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
🔺वणी उपविभागातील सर्व कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमावीत.
🔺‘लिंकिंग’ची सक्ती करणाऱ्या दुकानदारांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
🔺प्रत्येक कृषी केंद्राबाहेर उपलब्ध खतसाठा व शासनाने निश्चित केलेली किंमत (MRP) दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक करावे.
मनसेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, पुढील ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच संबंधित कृषी केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही फाल्गुन गोहोकार यांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेशजी पेचे, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, विट्ठल हेपट, रवि आगसकांडे, लक्ष्मण उपरे, दिनेश डोंगे, मारोती पडवे, मंगेश झाडे, खुशाल पानघाटे, गौरव काकडे, कुणाल पायघन, राहुल बोधाने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
हे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा कृषी अधिकारी तसेच पोलीस ठाणे वणी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.
🎯 अपडेट:
या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून लवकरच कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा जादा दर आकारणी होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.








