✍️पांढरकवडा: अशफाक खान
महावितरणच्या गावठाण फिटरजोडणी योजनेसाठी ठेवण्यात आलेले लोखंडी पोल गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरी करणाऱ्या टोळीचा पांढरकवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले लोखंडी पोलचे तुकडे, चोरीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन तसेच गॅस कटिंग साहित्य असा एकूण ५ लाख ५ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष रामगोपाल वर्मा हे खाजगी इलेक्ट्रिकल ठेकेदार असून ते पांढरकवडा डिव्हिजनमध्ये महावितरणच्या गावठाण फिटरजोडणी योजनेअंतर्गत मागील सहा महिन्यांपासून वीजजोडणीसाठी लोखंडी पोल, तार व डी.पी. बसविण्याचे काम करीत आहेत. या कामासाठी लागणारे एकूण १४४ लोखंडी पोल वाई-गणेशपूर शिवारात उतरविण्यात आले होते.
दि. १० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास ते कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी गेले असता १४४ पैकी १३ लोखंडी पोल जागेवरून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी गॅस कटरने पोल कापल्याचा मलबा पडलेला दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोल कापून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या पोलची किंमत तब्बल १ लाख ८१ हजार ६७६ रुपये इतकी होती.
याप्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ६४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर व गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
गोपनीय माहिती, तांत्रिक तपास व स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अखेर आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
१) शेख समीर शेख नजीर (वय २५) रा. बेघरवस्ती, इंदिरानगर पांढरकवडा, सध्या रा. खानापूर, अब्दुल्ला चौक, वार्ड क्र. ३२, आदिलाबाद
२) अक्षय पैकू आत्राम (वय २५) रा. आकोली (बु.), ता. केळापूर
३) भिमराव भाष्कर आत्राम (वय ३२) रा. मांगुर्डा, ता. केळापूर
४) गौरव अशोक वरखडे (वय २८) रा. इंदिरानगर, पांढरकवडा
५) शाहरुख युनुस खान (वय ३०), भंगार व्यवसायिक, रा. इंदिरानगर पांढरकवडा
यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या लोखंडी पोलचे ९२ तुकडे, चोरीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH 32 Q 3970), दोन ऑक्सिजन सिलिंडर, एक घरगुती गॅस सिलिंडर तसेच कटिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ५ हजार १७५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात आरोपींनी पोल कापून त्याचे भंगार करून विक्री करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चोरीसाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गॅस कटरचा वापर करण्यात आला होता. पोलिसांच्या जलद तपासामुळे चोरीचा गुन्हा उघडकीस येऊन मोठा भंगार रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पो.उप.नि. नितीन सुशिर, पो.हवा. प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, रजनिकांत पाटील, सुनील राठोड, सचिन काकडे व राजू मुत्यलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे पांढरकवडा परिसरातील भंगार चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







