⛔दोन ट्रकमधून अवैध जनावरांची वाहतूक उघड; ४५ गोवंशांची सुटका, तब्बल ५९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
✍️पांढरकवडा : अशफाक खान
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर पांढरकवडा उपविभागीय पोलिसांनी बुधवारी (दि.२० मे) सिनेस्टाईल पाठलाग करून मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रकमधून एकूण ४५ गोवंश जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक करताना आढळून आली. पोलिसांनी जवळपास ५९ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर काही आरोपी पसार झाले आहेत.
ही कारवाई श्री रॉबिन बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पांढरकवडा येथील पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली. या प्रकरणी दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
🎯 पहिली कारवाई : ट्रकचा थरारक पाठलाग
पोलीस हेड कॉन्स्टेबल रवि सिंहे यांना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की, नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या MH-34-AB-9782 क्रमांकाच्या १२ चाकी टाटा ट्रकमधून अवैध जनावरांची वाहतूक सुरू आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी, पंच आणि सहकारी कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. पोलिसांनी खाजगी वाहनातून पाठलाग सुरू केला. ट्रक चालकाने मनोराज हॉटेल परिसरातून यु-टर्न घेत वडकी मार्गे किन्हीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत मनोराज हॉटेलजवळ ट्रॅफिक जाम करून ट्रक अडविला.
वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात खाली पडला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख नौशाद शेख मोहम्मद नवाब (वय ३६, रा. भाजीमंडी, कामठी, नागपूर) असे सांगितले.
🎯 ट्रकमध्ये २३ गोवंश जनावरे
पंचांसमक्ष ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २३ गोवंश जातीचे नर जनावरे अतिशय अमानुष आणि क्रूर पद्धतीने दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली. जनावरांच्या पायांना, नाकाला व मानेस दोऱ्या बांधून त्यांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले होते. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना चालकाकडे नव्हता. तसेच वाहनाची कागदपत्रेही उपलब्ध नव्हती.
या कारवाईत अंदाजे ४ लाख ६० हजार रुपये किमतीची जनावरे, सुमारे २५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि वाहतुकीसाठी वापरलेल्या दोऱ्या असा जवळपास २९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🎯 दुसरी कारवाई : आणखी एक ट्रक पकडला
याच दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश नाईक यांना आणखी एका ट्रकबाबत माहिती मिळाली. MH-34-AV-0368 क्रमांकाच्या ट्रकमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पिंपरी रोड परिसरात नाकाबंदी केली.
ट्रक चालकाने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वाय पॉईंट परिसरात ट्रक अडविला. चालक आणि क्लिनर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एक आरोपी खाली पडल्याने पोलिसांच्या हाती लागला. त्याने आपले नाव अकील अयुब कुरेशी (वय ३०, रा. बंदा नवाज नगर, नागपूर) असे सांगितले.
🎯 २२ जनावरे क्रूरतेने कोंबलेली
या ट्रकमध्ये २२ गोवंश जातीची नर जनावरे अतिशय क्रूरतेने कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. जनावरांना इजा होईल अशा अवस्थेत पाय, नाक आणि मान बांधून त्यांना ट्रकमध्ये डांबण्यात आले होते. वाहतुकीचा कोणताही वैध परवाना चालकाकडे नव्हता.
या कारवाईत अंदाजे ४ लाख ४० हजार रुपये किमतीची जनावरे, २५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि इतर साहित्य असा सुमारे २९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🎯 जनावरांना कोंडवाड्यात हलविले
दोन्ही कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सर्व ४५ गोवंश जनावरांना पांढरकवडा नगर परिषद गुरांच्या कोंडवाड्यात हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी चारापाणी आणि पालनपोषणाची व्यवस्था करण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
🎯 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५) मधील कलम ५, ५(अ), ५(ब) तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पांढरकवडा परिसरात राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अवैध जनावर वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे जनावर तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.







