✍️पांढरकवडा : सफी खान
शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना पांढरकवडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका सराईत वाहन चोराला अटक करून तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीस गेलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीकडून महत्त्वाची माहितीही समोर आली आहे.
दि. १९ मे २०२६ रोजी फिर्यादी नितीन मारोती सव्वालाखे, रा. साई मंदिर, पटेल ले-आऊट, पांढरकवडा यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास जीवन वेलफेयर हॉटेलसमोर उभी केलेली त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २९ बीएक्स २५१६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले.
या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ६९९/२०२६ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात करण्यात आली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री. एल. डी. तावरे यांनी तातडीने दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपी व चोरीस गेलेल्या मोटारसायकलीचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास, गोपनीय माहिती तसेच विविध ठिकाणांवरील हालचालींचा अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपी मिलिंद जयभारत डंभारे, रा. लोणी ता. कोरपणा याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून पांढरकवडा येथून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीने आणखी दोन दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीने दि. १२ मे २०२६ रोजी मोहदा (ता. केळापूर) येथून एक शाईन मोटारसायकल चोरी केल्याचे तसेच दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राजुरा, जि. चंद्रपूर येथून आणखी एक दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या.
या यशस्वी कारवाईमुळे तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून वाहनचोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या सराईत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोउपनिरीक्षक नितीन सुशीर, पोहेकॉ. प्रमोद जुनुकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनिल राठोड, सचिन काकडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पोहेकॉ. आनंद अलचेवार आणि पोहेकॉ. रविकांत दराडे करीत आहेत.







