⛔ एका दिवसात ५७४ लाभार्थ्यांचे निशुल्क डिजिटल लाईफ सर्टिफिकेट; प्रशासनाच्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक
✍️पांढरकवडा: सफी खान
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate – DLC) सहज, सुलभ व निशुल्क पद्धतीने उपलब्ध व्हावे, तसेच लाभार्थ्यांचे मानधन बंद होण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य हयात प्रमाणपत्र शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संजय गांधी विभाग केळापूर, तालुक्यातील महसूल सेवक, सेतू सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बचत भवन, नगर परिषद पांढरकवडा येथे आज रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या शिबिरामध्ये लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.
या शिबिरात पांढरकवडा शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित झाले होते. अवघ्या काही तासांत तब्बल ५७४ लाभार्थ्यांचे डिजिटल हयात प्रमाणपत्र काढण्यात आले. प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने स्वतंत्र काउंटर, तांत्रिक सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली.
अनेक वृद्ध, निराधार, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले. एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय टळली असून प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वेळेत प्रमाणपत्र सादर न झाल्यास निवृत्तीवेतन अथवा मानधन थांबण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पुढाकार घेत हा उपक्रम राबविल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर शिबिराचे आयोजन नायब तहसीलदार राजू मोट्टेमवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रवैयाजी डोंगरे आणि तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. शिबिराला शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांनी भेट देत प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत पानगे, संजय बोकरे (ग्राम महसूल अधिकारी पांढरकवडा), संजय थोडगे, अनिल नवले, गणेश देवलवार, शशिकांत निमसटकर, कुणाल ऐंचलवार, राहुल काळे, शुभम पाटील, नंदू गेडाम, राजू मडावी, छत्रपती मडावी, मोरेश्वर सोयाम, बाळकृष्ण कनाके, इसरत सुलेमान शेख, पुनम मडावी, स्मिता आडे, सारिका आत्राम, सरिता रामगीलवार, सुभाष गेडाम, इमरान खान, राहुल शेटे, जावेद अली, वसीम सय्यद, सेतू व्यवस्थापक, महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थापक तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शासकीय सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून भविष्यातही अशाच प्रकारची शिबिरे नियमित आयोजित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









