✍️पांढरकवडा : अशफाक खान
शहरातील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी आज दि. 27 मे रोजी धाड टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 75 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर यांना गोपनीय माहितीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती की, काही इसम आठवडी बाजार परिसरात पैशांची बाजी लावून “एक्का बादशहा” नावाचा जुगार खेळ खेळवत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर व डी.बी. पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान आरोपी नामे राजेश प्रल्हाद शिडाम (चंद्रशेखर वॉर्ड), बैरू देवू टेकाम (वसंत नगर), पळसराम हरी राठोड (दहेली तांडा), विक्रम दत्तू व्यास (चंद्रशेखर वॉर्ड), रामभाऊ तुकाराम जट्टेवार (इंदिरा नगर), शेख आसिफ शेख अकबर (राम मंदिर वॉर्ड), संतोष नारायण पांगडू (कोपरी), वंश मीठाईलाल गुप्ता (चंद्रशेखर वॉर्ड), शुभम गजानन टाले (गुलशन पार्क), मनोज मीठाईलाल गुप्ता (चंद्रशेखर वॉर्ड) व कैलास गंगाराम सोनेकार (बोरगाव) हे जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून 29 हजार 40 रुपयांची रोख रक्कम तसेच 5 मोबाईल फोन किंमत 46 हजार रुपये असा एकूण 75 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) तसेच भारतीय दंड विधान कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, पोलीस हवालदार आनंद अलचेवार, प्रमोद जुनुनकर, रजनिकांत पाटील, सुनिल राठोड, सचिन काकडे, राजू मुत्यलवार आणि नरेंद्र सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.








