ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची राजू उंबरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

On: June 11, 2026 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी — प्रतीनिधी


वणी उपविभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कोळसा खाणी, कोळसा सायडिंग आणि कोळसा वाहतुकीमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून वेकोली कंपनीमार्फत वणी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात उंबरकर यांनी वणी परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक संकटाकडे लक्ष वेधले आहे. वणी उपविभाग हा राज्यातील महत्त्वाचा कोळसा उत्पादक पट्टा असून, येथील खाजगी व शासकीय कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर कोळसा उत्खनन केले जाते. या उद्योगांमधून कोट्यवधी रुपयांचा महसूल व नफा मिळत असला तरी त्याची किंमत येथील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आरोग्याच्या स्वरूपात चुकवावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या वणी उपविभागातील अनेक गावांमध्ये हवेत मोठ्या प्रमाणात कोळशाच्या धुळीचे कण मिसळलेले दिसून येतात. कोळसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ, सायडिंग परिसरातील प्रदूषण, खाणींमधील स्फोट आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे परिसरातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच दूषित होत आहे. परिणामी नागरिकांना दमा, श्वसनाचे विकार, सतत खोकला, छातीत दुखणे, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक आणि शेतकरी वर्गाला बसत आहे. प्रदूषण केवळ हवेपुरते मर्यादित नसून, अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर तसेच शेतीच्या जमिनीवरही त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. यामुळे शेती उत्पादनात घट होत असून नागरिकांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती दोन्हीही धोक्यात आल्याचे उंबरकर यांनी निदर्शनास आणून दिले.

वणी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष उपचार विभागांची कमतरता असल्याने गंभीर रुग्णांना नागपूर, पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

यावर उपाय म्हणून वणी येथे वेकोली कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात कर्करोग उपचार विभाग, फुफ्फुस विकार विभाग, हृदयरोग विभाग, अत्याधुनिक आयसीयू, आपत्कालीन सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, डायलेसिस केंद्र तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवून कोळसा वाहतुकीचे नियमन करावे, धूळ नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी तसेच नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

वणी उपविभागातील वाढते प्रदूषण आणि आरोग्यविषयक संकट हा अत्यंत गंभीर जनहिताचा विषय असून, राज्य शासनाने याची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. :::

उपशीर्षक :

कोळसा खाणी, सायडिंग व वाहतुकीमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम; कर्करोग, हृदयविकार व श्वसनरोगांसाठी विशेष उपचार केंद्राची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment