⛔पाठलाग करून रोकड चोरी करणाऱ्या टोळ्यांपासून सतर्क राहा; पांढरकवडा पोलिसांचे नागरिक व बँकांना महत्त्वाचे सुरक्षा निर्देश
✍️पांढरकवडा: अशफाक खान
बँकेतून मोठी रोख रक्कम काढणाऱ्या ग्राहकांचा पाठलाग करून त्यांचे लक्ष विचलित करत वाहनातील किंवा हातातील रोकड लंपास करण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी आणि बँक प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवावी, असे आवाहन पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी केले आहे.
अलिकडच्या काळात काही गुन्हेगार बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकांवर पाळत ठेवतात. त्यानंतर वाहनाला धक्का लागल्याचे सांगणे, टायर पंक्चर झाल्याची खोटी माहिती देणे, पैसे किंवा कागद खाली पडल्याचे भासवणे, रस्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवणे अशा विविध क्लुप्त्या वापरून ग्राहकांचे लक्ष विचलित केले जाते. या संधीचा फायदा घेत वाहनातील किंवा हातातील रोख रक्कम चोरी केली जाते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने बँकांना ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

🎯 पांढरकवडा पोलिसांच्या महत्त्वाच्या सुरक्षा सूचना
🔺१. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करावे
बँकेतून मोठी रोख रक्कम काढणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कॅशियर किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबाबत आवश्यक सूचना द्याव्यात.
🔺२. लक्ष विचलित करणाऱ्यांपासून सावध राहा
रोख रक्कम वाहनात लॉक करून ठेवू नये. रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ती आवाज देत असेल, वाहनाबाबत काही सांगत असेल किंवा कोणत्याही कारणाने थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर विशेष सावधगिरी बाळगावी.
🔺३. संशयास्पद व्यक्तींची माहिती द्या
बँक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या किंवा ग्राहकांवर संशयास्पदरीत्या लक्ष ठेवणाऱ्या व्यक्ती आढळल्यास तात्काळ पांढरकवडा पोलिसांना माहिती द्यावी. बँक परिसरात येणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे.
🔺४. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी
बँकेच्या आतील तसेच बाहेरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे नेहमी सुरू व सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
🔺५. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे
शक्यतो मोठी रोकड सोबत नेण्याऐवजी डिजिटल व्यवहार, ऑनलाइन पेमेंट किंवा सुरक्षित आर्थिक व्यवहारांचा पर्याय स्वीकारावा.
🔺६. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी
प्रत्येक बँकेने प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमून ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे.
🔺७. जनजागृतीचे फलक लावावेत
वरील सर्व सुरक्षा सूचनांचे फलक बँकेच्या दर्शनी भागात व ग्राहकांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावून नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
🎯 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे तसेच पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा संशय आल्यास किंवा चोरीचा प्रयत्न झाल्यास वेळ न दवडता तात्काळ पांढरकवडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
“सतर्क नागरिक हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. स्वतःची आणि आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा,” असे आवाहन पांढरकवडा पोलिसांनी केले आहे.










