ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोहदा येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड लंपास, फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

On: June 30, 2026 5:22 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


तालुक्यातील  यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील मोहदा गावात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि सुमारे 50 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहदा येथील हनुमान वॉर्ड परिसरात राहणारे सुखदेव दोनाडकर हे दि.28 जुन रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते. त्यानंतर ते सकाळी सुमारे 10.30 वाजता घरी परतले. घराला कुलूप लावून ते कुटुंबासह एका लग्नसमारंभासाठी रवाना झाले.

दरम्यान, दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची आई घराची पाहणी करण्यासाठी आली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेली सुमारे 50 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच  8 ग्राम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील पीयूष गबराणी यांनी तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घराची आणि परिसराची बारकाईने पाहणी करून ठसे व इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 331(3) आणि 305(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीवायएसपी रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार लहुजी तावडे, तपास अधिकारी रमाकांत खंदारे तसेच नितीन सुशीर, विलास जाधव, सचिन काकडे, सुनील राठोड आणि निकेलेश चव्हाण यांचे पथक विविध अंगांनी तपास करत आहे.

भरदिवसा झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे मोहदा गावासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment