✍️पांढरकवडा | अशफाक खान
पाटणबोरी येथे पुन्हा सुरू झालेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप सुरपाम यांनी दि. ३० जून २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना निवेदन सादर करून तात्काळ व कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे. तसेच, कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन तसेच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, पाटणबोरी येथे काही महिन्यांपासून बंद असलेला अवैध मटका व्यवसाय मोनू व गोलू या जोड गोळीने पुन्हा सुरू सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः सम्राट हॉटेल परिसर, ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस, मुख्य चौक, बसस्थानक परिसर, राष्ट्रीय महामार्गालगतचा चनावार कॉम्प्लेक्स, अशोक बार परिसर, तसेच पाटण रोड पुलाजवळील परिसरात खुलेआम मटका काऊंटर सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या अवैध व्यवसायामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रभावित होत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून, काही शेतकरी शेतीसाठी राखून ठेवलेली रक्कम मटक्यात गमावत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच, तेलंगण राज्यातून मोठ्या संख्येने मटका खेळणारे पाटणबोरी येथे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः सम्राट हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, झरी-जामणी तालुक्यातील मांडवी येथील दिलीप नावाच्या व्यक्तीकडून ऑनलाइन मटका चालवला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून, या व्यवसायातून मोठी आर्थिक मालमत्ता उभी केल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित ऑनलाइन मटका व्यवसायावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संदीप सुरपाम यांनी यापूर्वीही अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या असूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध मटका कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा उपोषण आंदोलन करण्यात येईल, तसेच पुराव्यासह हा प्रकार सोशल मीडियावर मांडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.










