✍️पांढरकवडा: अशफाक खान
खून, मारामारी, दरोडा, शस्त्र बाळगणे तसेच खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला आणि घटनेनंतर फरार झालेला कुख्यात तडीपार आरोपी करण संजय शिंदे (वय 32, रा. ताडउमरी, ता. केळापूर) याला पांढरकवडा पोलिसांनी नागपूर शहरातून शिताफीने ताब्यात घेत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 जून 2026 रोजी फिर्यादी आकीब बेग अहेफाज बेग मिर्झा (वय 28, रा. मोमीनाबाद कॉलनी, पांढरकवडा) यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 787/2026 दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 109, 189(2), 189(4), 190, 191(1), 191(3) तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम कलम 7 आणि शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आरोपी म्हणून सुजित मोक्षवीर वानखेडे, शेख समीर शेख चाँद, पार्थ पंकज शेटे, आशिष माणिक बेहेरे, साईराम सुखदेव आगरकर आणि एका अल्पवयीन आरोपीसह एकूण सहा आरोपींना घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी करण शिंदे हा तेव्हापासून फरार होता.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक तपासाचे जाळे उभारले. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नागपूर शहरात लपून बसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या अटकेमुळे या गुन्ह्याच्या तपासाला अधिक गती मिळणार असून, इतर बाबींचाही तपास पोलीस करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, पोलीस नाईक सुनिल राठोड, सचिन काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आरोपीला नागपूरातून यशस्वीरित्या जेरबंद केले.
पांढरकवडा पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचा पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.










