✍️चंद्रपूर : प्रतिनीधी
चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करून या प्रकरणातील सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहरात नवजात बालकाची विक्री झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक व संतापजनक असून त्यामुळे संपूर्ण शहरात चिंता व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन महिलांची नावे समोर येत असल्याची चर्चा असून, या कथित बालक विक्रीमागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) कोण आहे, तसेच अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सर्वंकष तपास करण्यात यावा. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच, पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी ओमकार गेडाम याच्यावरही कठोर कारवाई करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दोन्ही गंभीर प्रकरणांची जलद आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भूमिका पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी कायद्यानुसार निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देताना ओबीसी सेल शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, कामगार सेल शहर जिल्हाध्यक्ष महेश काहीलकर, विद्यार्थी अध्यक्ष परब गिरडकर, शहर सचिव किशोर शेडमाके, सरस्वती गावंडे, सुनंदा महाते, कविता धकाते तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











