⛔ रस्त्यांवर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका; महापालिकेकडे त्वरित कारवाईची मागणी
✍️चंद्रपूर: प्रतिनीधी
नुकत्याच चंद्रपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मित्रनगर, जटपुरा, भानापेठ, तुकूम यांसह विविध प्रभागांतील रस्त्यांवर सार्वजनिक नाल्यांचे सांडपाणी वाहताना दिसून आले. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) युवती काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कु. माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांनी केली आहे.
माधुरी कटकोजवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यांवर आले आहे. यामुळे दुर्गंधी, डासांची वाढ आणि विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केवळ प्रभावित प्रभागांपुरते मर्यादित न राहता शहरातील सर्व प्रमुख व उपनाल्यांची युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी.

त्यांनी पुढे सांगितले की, पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच संबंधित विभागाने नाल्यांमधील गाळ, कचरा व अडथळे हटवून पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची खात्री करावी. यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर सांडपाणी साचण्याच्या समस्या टाळता येतील आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
या मागणीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या शहर जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई उईके तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांनाही युवती काँग्रेसच्या वतीने देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
🎯 मुख्य मागण्या
🔺शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची तातडीने सफाई करावी.
🔺मित्रनगर, जटपुरा, भानापेठ, तुकूम आदी प्रभावित भागांना प्राधान्य द्यावे.
🔺नाल्यांमधील गाळ व कचरा हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करावा.
🔺पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
🔺महानगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवून नियमित देखरेख करावी.









