✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली असून या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या (डी.बी. पथक) अचूक माहिती, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत देवराव कोडापे (रा. ताडउमरी, ता. केळापूर) यांनी १६ जून २०२६ रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29-H-5406) ही सुमारे ₹35 हजार किमतीची मोटारसायकल १६ जून रोजी पहाटे २ ते सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 809/2026 अन्वये कलम 303(2), भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू असताना, प्रणय नामदेव नैताम (वय 18 वर्ष 8 महिने, रा. ताडउमरी, ता. केळापूर) याने सदर मोटारसायकल चोरी करून ती प्रेम अमर थुल (वय 22 वर्ष, रा. नेहरू नगर, घाटंजी) याच्याकडे ठेवली असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान प्रेम थुल याच्या घरातून चोरीस गेलेली MH-29-H-5406 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला असून चोरीस गेलेली दुचाकी मालकाला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे वाहनचोरी करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात यश आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. नितीन सुशीर, पोहेकॉ. प्रमोद जुनुकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनील राठोड, सचिन काकडे, पोकॉ. राजू मुत्तलवार यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
या गुन्ह्याचा पुढील तपास नापोकॉ. संदीप मडावी आणि जया रोगे करीत आहेत.











