ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

उमरखेड कृषी महाविद्यालयात ‘महाराष्ट्र कृषी दिन’ उत्साहात; नागापूर व बारा येथे ८० हून अधिक वृक्षांचे भव्य वृक्षारोपण

On: July 5, 2026 7:03 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️उमरखेड | प्रतिनिधी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, उमरखेड येथे १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र कृषी दिन’ उत्साहपूर्ण आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालय परिसरासह स्मार्ट ग्राम नागापूर आणि बारा येथे भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत नागापूर व बारा येथील मोक्षधाम तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी ८० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपणावर न थांबता लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याचा सामूहिक संकल्प प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन चिंतले होते. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण योगदानाचा गौरव करत शाश्वत आणि आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. तुषार चव्हाण, प्रा. पी. व्ही. गोटेकर, प्रा. योगेश वाकडे आणि डॉ. सुनील पवार यांनीही विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञानाधारित शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमाला नागापूर येथील श्री. चितांगराव कदम, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे शिक्षक, दोन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात डॉ. श्वेता सोळंके, डॉ. माधवी भालदरे, कु. पल्लवी घोटेकर, प्रा. संतोष अंभोरे आणि श्री. किशोर आगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हा सामाजिक संदेश देत वृक्षसंवर्धनाचा निर्धार व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. प्रीती बुरकुले आणि कु. कांचना आढाव यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत शेतीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment