ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

१२ वर्षांपासून फरार असलेल्या पोस्को प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक; पाटण पोलिसांची धाडसी कारवाई, केळापूर न्यायालयासमोर हजर

On: July 7, 2026 11:11 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️झरी :  अशफाक खान


तब्बल १२ वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेपासून फरार असलेल्या आणि बलात्कारासह गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बिहार राज्यातून शोधून काढत पाटण पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि अचूक नियोजनाच्या बळावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला अखेर न्यायालयासमोर उभे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पाटण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तसेच माननीय विशेष पोस्को न्यायालय, केळापूर येथील विशेष पोस्को प्रकरण क्र. ५/२०१४ (शासन विरुद्ध चिकूकुमार) मधील आरोपी चिकूकुमार उर्फ आर्यमान अजय राय (वय ३२ वर्षे), रा. फाजेलपूर, ता. शिरपूर, जि. बेगूसराय (बिहार) हा गेल्या १२ वर्षांपासून न्यायालयात हजर राहत नसल्याने फरार घोषित करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Warrant – NBW) जारी केले होते.

या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी पाटण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरकटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार मुकेश करपते, पोलीस शिपाई सचिन बोंडे , पोलीस शिपाई संदीप नामेकर आणि महिला पोलीस शिपाई ज्योती तपासे यांचा समावेश होता. हे पथक खासगी वाहनाने बिहार राज्यात रवाना झाले.

🎯 झोपेत असतानाच आरोपीला घेतले ताब्यात

बिहारमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा अचूक ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी अत्यंत धोकादायक प्रवृत्तीचा असल्याने कारवाई अत्यंत सावधगिरीने करण्यात आली. अखेर आरोपी झोपेत असतानाच त्याला कोणतीही संधी न देता शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

🎯 बिहारमध्येही गंभीर गुन्ह्यांची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध बिहार राज्यात खून (Murder), आर्म्स अॅक्ट यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही नोंद आहेत. त्यामुळे या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कारवाई अधिक आव्हानात्मक ठरली.

🎯 केळापूर न्यायालयासमोर हजर; न्यायालयीन कोठडी

अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला कडेकोट बंदोबस्तात महाराष्ट्रात आणण्यात आले. त्यानंतर त्याला माननीय न्यायालय, केळापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस यवतमाळ जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देत जेल वॉरंट जारी केले.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम

ही संपूर्ण कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच पाटण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरकटे यांनी बिहारमध्ये गेलेल्या पथकाशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक सूचना दिल्या. आरोपीला सुरक्षित ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलीस हवालदार सुगत दिवेकर, पोलीस शिपाई प्रशांत तलांडे तसेच पाटण पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रभावी नियोजन आणि समन्वय साधला.

🎯 पाटण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीला बिहारसारख्या दूरच्या राज्यातून अटक करण्यात पाटण पोलिसांना मिळालेले यश हे त्यांच्या धाडस, संयम, अचूक नियोजन आणि उत्कृष्ट समन्वयाचे द्योतक मानले जात आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे फरार आरोपींविरोधात पोलिसांचा शोधमोहीम अधिक प्रभावीपणे सुरू असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment