ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आषाढी एकादशीनिमित्त लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरण; श्री विठ्ठल पालखी सोहळा उत्साहात संपन्न

On: July 29, 2026 3:07 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी:  प्रतिनीधी


महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या समृद्ध वारकरी परंपरेचा वारसा जपत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त तसेच आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ‘श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे’ अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, अध्यात्म आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून प्रती पंढरपूर वारी, पालखी सोहळा, वारकरी दिंडी, फुगडी आणि कवायतींचे आकर्षक सादरीकरण केले. देशमुखवाडीच्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या दिंडीत “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकोबा” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग आणि टाळ्यांच्या गजरात अभंग व भजन सादर करत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. अनेक विद्यार्थ्यांनी भगवान श्री विठ्ठल, माता रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच वारकऱ्यांचा पारंपरिक वेष धारण करून उपस्थितांची मने जिंकली. पालखी सोहळ्याचा देखावा, वारकऱ्यांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचे भावपूर्ण सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी शाळेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी श्री विठ्ठल-रखुमाई व पालखीचे विधिवत पूजन करून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारकरी परंपरेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा, शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होत असल्याचे सांगितले.

शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख, वारकरी संप्रदायाचे महत्त्व, आषाढी वारीची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संगम ठरलेला हा श्री विठ्ठल पालखी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment