🎯वणी : प्रतिनिधी
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वणी येथून विजय नगराळे मित्र परिवारातील उपासक शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात रवाना झाले. आंदोलनाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्तीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विजय नगराळे, संजय तेलंग सर, किशोर चहांदे सर, भारत कुंभारे सर, अनिल थूल सर आणि रवीभाऊ कनाके हे वणीहून रवाना झाले.
रवानगीपूर्वी आयोजित कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष आयु. सुरेशभाऊ रायपूरे यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या उपासकांचे हार घालून स्वागत केले. यावेळी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनारखंन सर यांनी केले. त्यानंतर प्रा. पुरुषोत्तम पाटील सर यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पार्श्वभूमी, आंदोलनाची भूमिका तसेच पुढील आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. महाबोधी महाविहार हा बौद्ध समाजाच्या श्रद्धेचा आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू असून, त्याच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात शांततामय व संघटित पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी आयु. प्रा. पुरुषोत्तम पाटील सर, आयु. जीवने साहेब आणि आयु. सुरेशभाऊ रायपूरे यांनी पंचशील ध्वज दाखवून आंदोलनासाठी रवाना होणाऱ्या उपासकांना शुभेच्छा दिल्या. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी व्हावे आणि आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पंचशील ध्वजाच्या साक्षीने वणीहून निघालेल्या या उपासकांच्या सहभागामुळे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला स्थानिक पातळीवरही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.







