ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

On: August 22, 2026 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️यवतमाळ : अशफाक खान

रावेर पोलीस ठाणे जि.जळगांव हद्दीत घडलेल्या चार अल्पवयीन मुलांच्या सामूहिक हत्याकांडातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने या बहुचर्चित प्रकरणाला ऐतिहासिक व निर्णायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून दोषसिद्धी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंतां यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते उत्कृष्ट दोषसिद्धी प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

रावेर परिसरातील या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. उपलब्ध माहितीनुसार, घटनेत दोन मुले आणि दोन मुली अशा चार अल्पवयीनांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. शेतातील घरात घडलेल्या या घटनेनंतर सुरुवातीला आरोपीबाबत ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
दि.15.10.2020 रोजी यातील फिर्यादी शेतमजूर हे कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते व शेतातील घरात त्यांची दोन मुले व दोन मुली अशी चार अल्पवयीन अपत्य घरीच थांबले होते. दि.16.8.2020 रोजी सकाळी 8 वाजता
संबंधित शेत मालक शेतात गेल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून पाहिले असता चारही अल्पवयीन मृतावस्थेत आढळून आले. मृतांमध्ये १३ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा, ८ वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी यांचा समावेश होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात समोर आले.

या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे ठिकाण शेतातील एकांत भागात असल्याने आणि आरोपीबाबत कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसल्याने तपास अत्यंत आव्हानात्मक ठरला.

🎯 ‘लास्ट सीन थिअरी’च्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले तपास पथक

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतींसोबतच तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला. तपासात आरोपी महेंद्र सीताराम बारेला, रा. स्वस्तिक टॉकीजजवळ, बृहाणपूर रोड, रावेर, ता. भुसावळ, जि. जळगाव याच्याविरुद्ध महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाले.

तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या हालचाली, घटनाक्रम आणि उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून ‘लास्ट सीन थिअरी’ (Last Seen Theory) च्या आधारे आरोपीचा गुन्ह्याशी संबंध जोडण्यात तपास पथकाला यश आले.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नसतानाही परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या पुराव्यांच्या सांगडीतून आरोपीविरुद्ध दोषसिद्धीचा भक्कम पाया तयार करण्यात आला.

🎯 अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचाही तपासात उलगडा

तपासादरम्यान मृत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्ह्यात भारतीय दंड विधानातील संबंधित गंभीर कलमे तसेच पोक्सो कायद्यातील तरतुदी लागू करण्यात आल्या. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी हत्येसोबतच लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबतही आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

🎯 सहा वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर ऐतिहासिक निकाल

या प्रकरणाची सुनावणी भुसावळ येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच विशेष न्यायालयात झाली. विशेष केस क्रमांक १४/२०२० अंतर्गत चाललेल्या या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची न्यायालयाने सखोल छाननी केली.

तत्कालीन परिविक्षाधीन अधिकारी तथा तपास अधिकारी पोलीस अधीक्षक कुमार चिंतां यांनी केलेल्या तपासाची न्यायालयाने दखल घेतली. सुमारे सहा वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर ४ जून २०२६ रोजी ऐतिहासिक निकाल देण्यात आला.

न्यायालयाने चार निष्पाप अल्पवयीनांच्या सामूहिक हत्याकांडासह अत्याचाराचा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याचे मानून तो ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare Case) प्रकारातील असल्याचे घोषित केले. आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पोक्सो व अत्याचाराच्या कलमांखालीही कठोर शिक्षा ठोठावण्यात आली.

🎯 तपास कौशल्याचा राज्यस्तरीय गौरव

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा थेट पुरावे उपलब्ध नसतानाही परिस्थितीजन्य, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांची शास्त्रोक्त पद्धतीने सांगड घालत आरोपीविरुद्ध दोषसिद्धी मिळवून देणे ही तपास यंत्रणेसाठी उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

या उल्लेखनीय तपासाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते २१ ऑगस्ट २०२६ रोजी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंतां यांना उत्कृष्ट दोषसिद्धीचे प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

चार अल्पवयीनांच्या हत्येसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना वैज्ञानिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचून न्यायालयात दोषसिद्धी मिळवून देण्यात आलेले यश महाराष्ट्र पोलिसांच्या तपास कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे. या कामगिरीमुळे पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment