⛔डॉ. संकेत चवरडोल यांची मोठी आर्थिक फसवणूक; बँक आणि पोलिसांच्या प्रतिसादाबाबत नाराजी, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
✍️पांढरकवडा: अशफाक खान
सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक चलाख होत असून, एका निष्काळजी क्षणाचा फायदा घेत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. अशीच धक्कादायक घटना पाटणबोरी येथे उघडकीस आली असून, बँकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने डॉ. संकेत चवरडोल यांची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. केवळ फोनवर आलेला एक ओटीपी सांगितल्यामुळे त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ही रक्कम क्षणार्धात लंपास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता डॉ. संकेत चवरडोल यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला ॲक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमच्या क्रेडिट कार्डवर जमा झालेले रिवॉर्ड पॉईंट रिडीम करून त्याचे पैसे मिळवून देतो, असे सांगत त्याने विश्वास संपादन केला.
यानंतर “तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो आमच्या अधिकृत सिस्टीममध्ये टाकण्यासाठी आम्हाला सांगा,” अशी विनंती करण्यात आली. बँकेचा अधिकृत कॉल असल्याचा समज झाल्याने डॉ. चवरडोल यांनी तो ओटीपी सांगितला. मात्र काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डमधून १ लाख ८० हजार रुपये डेबिट झाल्याचा संदेश आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
विशेष बाब म्हणजे, संबंधित क्रेडिट कार्ड काही दिवसांपूर्वी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः दवाखान्यात येऊन दिले होते. डॉ. चवरडोल यांनी हे कार्ड एकदाही वापरले नव्हते. त्यामुळे अशा प्रकारे कार्डचा गैरवापर होऊन मोठी रक्कम काढली गेल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

फसवणुकीची माहिती मिळताच डॉ. चवरडोल यांनी तातडीने क्रेडिट कार्ड व संबंधित बँक खाते ऑनलाइन ब्लॉक केले. त्यानंतर राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार प्रणालीवर ऑनलाइन तक्रार नोंदवली. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार दिली आणि दुसऱ्या दिवशी संबंधित बँकेच्या शाखेतही लेखी निवेदन सादर केले.
मात्र, घटनेला 4,5 दिवस उलटूनही फसवणुकीची रक्कम परत मिळालेली नाही. याबाबत बोलताना डॉ. चवरडोल यांनी, “बँकेकडून आणि पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली असती तर कदाचित रक्कम वाचवता आली असती,” अशी खंत व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. सायबर गुन्हेगार बँक कर्मचारी, विमा प्रतिनिधी, केवायसी अपडेट अधिकारी किंवा रिवॉर्ड पॉईंट देणारे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे अनेक प्रकरणांत दिसून आले आहे.
🎯 नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
– कोणत्याही परिस्थितीत मोबाईलवर आलेला ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
– बँकेचे अधिकारी कधीही फोनवर ओटीपी किंवा गोपनीय माहिती विचारत नाहीत.
– संशयास्पद फोन किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका.
– फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित कार्ड ब्लॉक करून सायबर हेल्पलाईन १९३० किंवा अधिकृत सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवा.
– शक्य तितक्या लवकर बँक आणि पोलिसांना लेखी माहिती द्या.
डॉ. संकेत चवरडोल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “मेहनतीने कमावलेले पैसे एका क्षणात गमवावे लागू नयेत, यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून ओटीपी किंवा बँकिंग माहिती देऊ नका. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलीस, बँका आणि नागरिक यांनी संयुक्तपणे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.”












