✍️पांढरकवडा: अशफाक खान
सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, पिन क्रमांक आणि सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या दोघांविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ‘म्युल अकाउंट’ (Mule Account) प्रकरणातील ही कारवाई असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे सायबर गुन्ह्यांसाठी आपले बँक खाते वापरण्यास देणाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी २७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान महाराष्ट्र बँक, पांढरकवडा शाखेतील खाते क्रमांक ६०३८५७४६०५४ हे खाते सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरले गेल्याचे उघड झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या खात्यावर १० एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत २ लाख १ हजार ७६८ रुपये जमा झाले. ही रक्कम देशातील चार वेगवेगळ्या नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळविण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी प्रणीत देविदास वावरे (वय ३३), रा. रामदेवबाबा लेआउट, पांढरकवडा व आशिष ज्ञानेश्वर सोयाम (वय २७), रा. बेतवार लेआउट, पांढरकवडा या दोघांना अटक केली आहे.

🎯 सायबर गुन्हेगारांना विकले बँक खाते व कागदपत्रे
पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी एप्रिल २०२६ मध्ये नवीन मोबाईल सिमकार्ड घेऊन ते संबंधित बँक खात्याशी जोडले. त्यानंतर ९ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी संबंधित बँक खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड, एटीएम पिन, तीन कोरे धनादेश (चेक) आणि बँक खात्याशी संलग्न सिमकार्ड हे सर्व पैसे घेऊन सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याच माध्यमातून सायबर फसवणुकीतील लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आले.
या प्रकरणात पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९४३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(C) व ६६(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे करीत आहेत.
🎯 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे, सहाय्यक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस शिपाई विशाल वाढई व राजू मुत्यालवार यांनी सहभाग घेतला.
🎯 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, पिन क्रमांक, धनादेश किंवा मोबाईल सिमकार्ड कोणालाही वापरण्यास देऊ नये, असे आवाहन पांढरकवडा पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारे आपले खाते किंवा कागदपत्रे उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींवरही सायबर गुन्ह्यात सहभागी म्हणून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, ‘म्युल अकाउंट’ म्हणजे सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. अनेकदा आर्थिक मोबदल्याच्या लालसेपोटी काहीजण आपली खाती उपलब्ध करून देतात; मात्र अशा कृतीमुळे ते स्वतः गंभीर गुन्ह्यात अडकू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपली बँकिंग माहिती किंवा खाते इतरांच्या वापरासाठी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.












