⛔ तेलंगणाकडे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याचा संशय; ६१.११ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनांतील संशयित फरार
✍️पांढरकवडा | अशफाक खान
दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल ५८ गोवंश जनावरे जप्त केली. ही जनावरे क्रूरपणे दोरीने बांधून कत्तलीसाठी तेलंगणा राज्याच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील सम्राट हॉटेलसमोर, पिंपळखुटी परिसर, तसेच ग्राम कोंघारा येथील NH-44 मार्गावर आणि करणवाडी फाटा, पांढरकवडा-घाटंजी घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. संशयित वाहनांचा पाठलाग करून पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेतली.
या कारवाईत पिवळ्या रंगाचे Alfa Plus वाहन क्रमांक MH-48-AG-0772, तसेच ट्रक क्रमांक MH-40-Y-3382 आणि MH-40-BL-4413 या वाहनांमधून एकूण ५८ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरांची अंदाजे किंमत १० लाख १ हजार रुपये, तर तीन वाहनांची अंदाजे किंमत ५१ लाख १० हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे.
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ६१ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे. जनावरांना वाहनांमध्ये दोरीने बांधून क्रूरपणे वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

दरम्यान, तिन्ही वाहनांमधील संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कलम २८१ भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित १९९५) मधील कलम ५, ५(अ), ५(ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(ड), (इ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि श्री. रॉबिन बन्सल, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोहेकॉ प्रशांत चौकडे आणि पोहेकॉ राजेश सुरोशे यांनी सहभाग घेतला.
फरार संशयितांचा शोध सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या जनावरांची पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.









