ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

किराणा सामानावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद ठरला जीवघेणा; मुलासह पत्नीवर खुनाचा गुन्हा

On: August 11, 2026 2:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मोहदा येथे ५२ वर्षीय गजानन जुमनाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू; मुलाने लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप, पत्नीनेही मारहाण केल्याची तक्रारीत नोंद

✍️पांढरकवडा | अशफाक खान

घरातील स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामान आणण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात होऊन ५२ वर्षीय गजानन गुलाब जुमनाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मोहदा येथे रविवारी (९ ऑगस्ट) रात्री घडली. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी मृताचे मोठे भाऊ रमेश जुमनाके यांच्या तक्रारीवरून पत्नी दुर्गा गजानन जुमनाके (४६) आणि मुलगा अक्षय गजानन जुमनाके (३२) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोहदा येथील शितला माता देवी वॉर्डमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 ऑगस्ट रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास गजानन जुमनाके आणि त्यांची पत्नी दुर्गा यांच्यात घरातील स्वयंपाकाचे किराणा सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला. या वेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पत्नीने पतीला धमकी दिल्याचेही मृताचे मोठे भाऊ रमेश यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

🎯 रात्री पुन्हा वाद; घरातून आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक धावले

रमेश जुमनाके यांचे घर गजानन यांच्या घराच्या जवळच असल्याने त्यांना सायंकाळच्या वादाचा आवाज ऐकू आला होता. त्यानंतर रात्री सुमारे ९ वाजता गजानन यांचा मुलगा अक्षय घरी आल्यानंतर पुन्हा घरात वाद सुरू झाला.

काही वेळातच घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येऊ लागल्याने परिसरातील काही तरुण घटनास्थळी धावून गेले. त्यावेळी घरात गजानन जुमनाके गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे दिसून आले.

🎯 मुलाने वडिलांच्या डोक्यावर दांड्याने प्रहार केल्याचा आरोप

रमेश जुमनाके यांच्या तक्रारीनुसार, अक्षय संतापलेल्या अवस्थेत होता. त्याने हातातील लाकडी दांड्याने वडील गजानन यांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गजानन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर अक्षयने दांडा खाली टाकल्यानंतर त्याची आई दुर्गा हिने तोच दांडा उचलून जमिनीवर पडलेल्या गजानन यांच्यावर दोन वेळा प्रहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

🎯 गंभीर अवस्थेत यवतमाळहून नागपूरला हलविले

घटनेनंतर गजानन जुमनाके यांना गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने चारचाकी वाहनातून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.

यानंतर गजानन यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान  सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

🎯 भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

गजानन यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे मोठे भाऊ रमेश जुमनाके यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुर्गा जुमनाके आणि अक्षय जुमनाके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

🔺या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे करीत आहेत.

🔺वरिष्ठ पोलिस अधिकारी व फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी पाहणी

घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहु तावरे, एपीआय सागर पेंढारकर, जमादार दराडे तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून विविध भौतिक पुरावे संकलित केले. घटनास्थळी आढळलेले रक्ताचे डाग, कथित मारहाणीसाठी वापरण्यात आलेला लाकडी दांडा तसेच इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू होते.

🎯 नेमका वाद आणि घटनाक्रम तपासाच्या केंद्रस्थानी

किराणा सामान आणण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद काही तासांतच गंभीर हल्ल्यात आणि त्यानंतर मृत्यूत परिवर्तित झाल्याने मोहदा परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. हल्ल्याची नेमकी परिस्थिती, वादाचे मूळ कारण, घटनाक्रम आणि त्यामध्ये प्रत्येकाची भूमिका याबाबत पांढरकवडा पोलीस सखोल तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment