✍️पांढरकवडा : सफी खान
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने सिटी प्राईड स्कूल, पांढरकवडा येथे मंगळवारी, दि. ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल २१ विद्यार्थ्यांनी या विज्ञान मेळाव्यात सहभाग घेत आपल्या वैज्ञानिक संकल्पना व कल्पकतेचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले होते. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पना, विचार आणि सादरीकरणातून त्यांची निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून आला. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता विज्ञानाकडे प्रयोगशील आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळाली.

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी राजू मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी गोकुळ गंधे, तसेच केंद्र समन्वयक अशोक सिंगेवार, विलास राठोड आणि निलेश गोपतवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परीक्षक म्हणून प्रशांत आमडे, सुभाष आकुलवार, सुशील माडपेल्लीवार यांनी जबाबदारी पार पाडली. तालुका विज्ञान समन्वयक सोनाली चिमोटे यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.
🎯 अन्विका जाधव प्रथम
विज्ञान मेळाव्यात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी अन्विका जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या वैज्ञानिक मांडणीचे आणि सादरीकरणाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. यार्डी इंग्लिश मीडियम स्कूल, उमरी येथील वेदिका हिवराळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर रेड्डीज कॉन्व्हेंट स्कूल, पाटणबोरी येथील सृष्टी सावळे हिला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विज्ञान मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले.
🎯 विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला मिळाले व्यासपीठ
आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान विषयातील कुतूहलाला योग्य दिशा मिळावी, विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा आणि नव्या कल्पनांना प्रत्यक्ष प्रयोगांची जोड द्यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा विज्ञान मेळावा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरला.

कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्या कु. श्वेता कुकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे विज्ञान मेळावा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, प्रयोगशीलतेला आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणारा हा विज्ञान मेळावा त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रेरणादायी ठरला.












