ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडले

On: August 12, 2026 1:48 PM
Follow Us:
---Advertisement---

व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण; शटर वाकवून चोरट्यांनी साधला डाव, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल तीन दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ११ ऑगस्टच्या रात्री दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे २१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, तिन्ही दुकानांमध्ये जवळपास एकाच पद्धतीने चोरी करण्यात आल्याने ही कामगिरी एखाद्या सराईत टोळीने केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सलग तीन दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव नगर येथील रहिवासी गजानन विठ्ठलराव काहाडे (वय ३९) यांचे अग्रसेन भवनजवळ ‘श्रीराम ट्रेडर्स’ नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दिवसभराचा व्यवसाय आटोपल्यानंतर रात्री सुमारे ९.४५ वाजता दुकान बंद करण्यापूर्वी त्यांनी गल्ल्यातील रोकड मोजून ठेवली.

गल्ल्यात ५० रुपयांच्या नोटांचे ५ हजार रुपयांचे बंडल, २० रुपयांच्या नोटांचे २ हजार रुपयांचे बंडल तसेच १०० रुपयांच्या ४५ नोटा, अशी एकूण ११ हजार ५०० रुपयांची रोकड होती. दुकानाचे शटर खाली ओढून कुलूप लावल्यानंतर काहाडे घरी गेले.

मात्र, दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता त्यांच्या मित्राचा फोन आला. काहाडे यांना त्यांच्या दुकानाचे शटर खालच्या बाजूने वाकलेले दिसत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच काहाडे यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली. दुकानात पाहणी केली असता शटर उचकटलेले आढळले, तर गल्ल्यातील रोकड गायब असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती घेऊन काहाडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले असता त्यांना परिसरातील आणखी दोन व्यापारी भेटले. त्यांच्याही दुकानांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आणि त्यामुळे चोरट्यांनी एकाच रात्री शहरातील तीन दुकाने लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले.

🎯 ‘स्वास्तिक प्लायवूड’मधून ८ हजारांची रोकड लंपास

आंबेडकर वॉर्डातील रहिवासी भास्कर बाबाराव येलेकर (वय ४५) यांचे जुन्या प्रोजेक्ट ऑफिसजवळ ‘स्वास्तिक प्लायवूड अँड ग्लास सेंटर’ हे दुकान आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यांच्या गल्ल्यात ५० रुपयांच्या नोटांचे ५ हजार रुपयांचे बंडल, २० रुपयांच्या नोटांचे २ हजार रुपयांचे बंडल आणि १० रुपयांच्या नोटांचे १ हजार रुपयांचे बंडल, अशी एकूण ८ हजार रुपयांची रोकड होती.

चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील संपूर्ण रोकड लंपास केली.

🎯 ‘अरिहंत पाईप्स’मधून चिल्लरवरही डल्ला

तिसरी चोरी गोपाळकृष्ण मंदिर वॉर्डातील ‘अरिहंत पाईप्स अँड हार्डवेअर’ या दुकानात झाली. दुकानाचे मालक विनोद बिंकमचंदजी सुराणा (वय ४५) यांनी रात्री सुमारे ९.२० वाजता दुकान बंद केले होते. गल्ल्यात १०, ५, २ आणि १ रुपयांची नाणी मिळून अंदाजे १ हजार ५०० रुपयांची रक्कम होती. चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश करत ही चिल्लरही लंपास केली.

🎯 मिळेल त्या रकमेवर चोरट्यांनी मानले समाधान!

या तीनही घटनांमध्ये चोरट्यांनी दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, मोठी रोकड मिळण्याऐवजी गल्ल्यात उपलब्ध असलेली रक्कमच चोरट्यांनी लांबवली. त्यामुळे चोरट्यांना दुकानांमध्ये नेमकी किती रक्कम आहे, याची माहिती होती की त्यांनी केवळ संधी साधून चोरी केली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

🎯 सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचा दुवा

एकाच रात्री शहरातील तीन वेगवेगळ्या दुकानांमध्ये समान पद्धतीने चोरी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, संशयास्पद हालचाली, वाहनांची ये-जा तसेच मध्यरात्री परिसरात फिरणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे.

गजानन काहाडे यांच्या फिर्यादीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, शहरात एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, संवेदनशील व्यापारी भागात नियमित पेट्रोलिंग करावे तसेच चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment