वाढदिवसानिमित्त ॲड. अजय कोठेवार यांचा अनोखा उपक्रम; जि. प. प्राथमिक शाळा मुची येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
✍️पांढरकवडा : सफी खान
वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत वाटून घेत तरुण वकील ॲड. अजय कोठेवार यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. वाढदिवसानिमित्त त्यांनी जि. प. प्राथमिक शाळा, मुची ता.केळापूर येथे भेट देत विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाचे आनंदाचे क्षण साजरे केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे खरे समाधान ठरले.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘मान्यवरांची मुलाखत’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या वतीने विद्यार्थिनी रोहिणी भारत गेडाम हिने ॲड. अजय कोठेवार यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी तिने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीपासून ते वकिली क्षेत्रातील यशस्वी प्रवासापर्यंत विविध पैलूंवर प्रश्न विचारत त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती जाणून घेतली. या संवादातून विद्यार्थ्यांना संघर्ष, सातत्य, मेहनत आणि ध्येय निश्चिती यांचे महत्त्व समजले.
दरम्यान, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ॲड. अजय कोठेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांनी भारावून गेलेल्या ॲड. कोठेवार यांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात मोठी प्रगती साधता येते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
“वाढदिवस हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला,” असे ॲड. अजय कोठेवार यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची प्रत्यक्ष मदत मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना आणि प्रेरणा निर्माण झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
या उपक्रमासाठी पवन सलाम यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी केतन कटकोजवार, आकाश कोठेवार, दानिश शेख, सत्यम पद्मगिरवार, विवेक पटकूटवार, शाहिद चव्हाण, निखिल गूंजेवार, सादिक शेख, दत्ता डोळे आणि दत्ता कनाके यांची उपस्थिती होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. ‘आपला आनंद इतरांच्या चेहऱ्यावर उमटवणे, हाच खरा वाढदिवसाचा उत्सव’ या विचाराची प्रचिती ॲड. अजय कोठेवार यांच्या या उपक्रमातून आली.












